मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने घेतला मृत्यूचा घोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:17 IST2022-12-28T14:56:30+5:302022-12-28T16:17:38+5:30
लोकमतने मांडले वास्तव; आ. बळवंत वानखडे यांची ‘लक्षवेधी’

मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने घेतला मृत्यूचा घोट
अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. दर १५ तासाला एक शेतकरीमृत्यूला कवटाळत आहे. मुलीची फी भरू न शकल्याने शेतकरी बापाने मृत्यूचा घोट घेतल्याची घटना नुकतीच अंजनगाव सुर्जी तालुक्यात घडली. दुष्काळ, नापिकीने शेतकऱ्यांचा धीर खचत असल्याने जिल्ह्यास विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. बळवंत वानखडे यांनी मंगळवारी सभागृहात केली.
जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने आ. वानखडे यांनी लक्षवेधी केली होती व मंगळवारी सकाळी यावर सभागृहात चर्चा झाली. जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत एकूण ३२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव नजिकच्या काळात निदर्शनास आलेले आहे. शासन व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा, आजारपण, कुटुंबाचे संगोपन, यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने समुपदेशनासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याउलट जिल्ह्यातील महाराष्ट्र बँक व अन्य बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठवत आहेत. खाती गोठवली जात आहेत. शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप आ. वानखडे यांनी केला.
सभागृहात ‘लोकमत’च्या वृत्ताचा पुरावा
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दै. 'लोकमत'ने यांची दखल घेत सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला लोकमतने समोर आणल्याचे ते म्हणाले.
डीसीएम पालकमंत्री असताना शेतकरी अडचणीत
उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या शासनामार्फत विदर्भाच्या आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर कायमचा अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी आत्महत्या
तत्कालीन प्रधानमंत्री, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी धामणगावला येऊन सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्प मंजूर केले. यात दर्यापूर मतदारसंघातील चंद्रभागा, वाघाडी, सामदा सौंदळी या प्रकल्पांना सन २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी असताना अद्यापपर्यंत प्रकल्प अपूर्ण असल्याने ते म्हणाले.
शेतकऱ्यांना एकत्रित योजनांचा लाभ देणार
आ. वानखडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ना. शंभूराजे देसाई यांनी शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येतील. याशिवाय संबंधित विभागाच्या एकत्रित योजनेचा लाभ त्या- त्या जिल्ह्यास देण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केल्या जात असल्याचे ना. देसाई यांनी सभागृहात सांगितले.