अमरावती जिल्ह्यात वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्यात ग्राफ वाढताच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:28 IST2025-12-31T15:27:01+5:302025-12-31T15:28:13+5:30
Amravati : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे.

Farmer suicides exceed 200 in a year in Amravati district; Graph rising in the state
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे. त्यामुळे हे सर्व शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.
जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत तब्बल १८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नैसर्गिक आपत्ती, नापिकी, बँकांसह सावकाराचे कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहे. सत्ता कोणाचीही असली तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकात थांबलेले नाही, किंबहुना यामध्ये वाढ होत आहे. वर्ष २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यांत ५,५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. शासन-प्रशासन शेतकरी आत्महत्या विषयात गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, मिशनद्वारा ठोस उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळालेले नाही.
२००१ पासून शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या - ५,५५७
शासन मदतीस पात्र - २,९१८
शासन मदतीत अपात्र - २५४७
चौकशीसाठी प्रलंबित - ९२
दोन दशकांपासून शासन मदतीत वाढ नाही
शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारास १९ डिसेंबर २००५ च्या शासनादेशानुसार फक्त एक लाखाची मदत दिली जाते. यात ३० हजारांचा धनाकर्ष, तर ७० हजारांची मुदत ठेव तहसीलदार व वारस यांच्या संयुक्त नावे ठेवली जाते. या मदतीमध्ये तब्बल २० वर्षात शासनाने वाढ केलेली नाही. सात-बारावरील बोजा कायम असल्याने त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.
२०२५ मधील शेतकरी आत्महत्या
यंदाच्या ११ महिन्यांत तब्बल १८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी १०, मार्च १६, एप्रिल १६, मे २५, जून २०, जुलै १६, ऑगस्ट २१, सप्टेंबर १७, ऑक्टोबर १७ व नोव्हेंबर महिन्यात १२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ४९ प्रकरणे पात्र, ४० अपात्र, तर ९२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.