अमरावतीहून थेट फराळ पोहोचला रशिया, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अन् फ्रान्सला
By जितेंद्र दखने | Updated: October 18, 2025 19:06 IST2025-10-18T19:03:56+5:302025-10-18T19:06:10+5:30
डाक विभागाची सुविधा : विदेशातील कुटुंबीयांपर्यंत पोहोचला दिवाळीचा गोडवा

Faral reached Russia, Canada, England, Australia and France directly from Amravati.
अमरावती : दिवाळी म्हणजे फराळ रेलचेल असते. चिवडा, लाडू, शंकरपाळे, शेव, चकली, अनारसे, करंजी आदीचा फडशा पाडल्याशिवाय दिवाळी काही केल्या पूर्ण होत नाही. अशात डाक विभागाच्या माध्यमातून विदेशात फराळ पाठविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यंदाही डाक विभागाद्वारे रशिया, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अन् फ्रान्सलाअमरावतीकरांनी विदेशातील आप्तांसाठी दिवाळी फराळाचा गोडवा स्पीडपोस्टद्वारे पोहोचला आहे.
डाक विभागाने यंदा विशेष उपक्रम हाती घेत विदेशात राहणाऱ्या नातेवाइकांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे विदेशात स्थायिक झालेले तसेच शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने असलेल्या अमरावतीकरांना फराळ पाठविण्याची सोय झाली आहे. त्याचा लाभ मागील काही दिवसांपासून अनेकांनी घेतला आहे. या माध्यमातून डाक विभागाला मोठा महसूल प्राप्त झाला आहे. डाक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत अमरावती येथील डाकघरातून रशिया, कॅनडा, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, फ्रान्स व अन्य ठिकाणी राहत असलेल्या विदेशातील कुटुंबियांपर्यंत पोहोचला दिवाळीच्या फराळचा गोडवा डाक विभागामार्फत पोहोचविला आहे.
कोरड्या स्वरूपातील फराळ पाठविण्याची सुविधा
डाक विभागामार्फत विदेशात पाठविला जाणारा दिवाळी फराळ हा कोरड्या स्वरूपात पाठविता येतो. स्पीड पोस्टद्वारे ३० किलोपर्यंत तर पार्सल सेवेने २० किलोपर्यंत फराळ पाठविण्यात येत आहे. फराळ कुठल्या देशात पाठविण्यात येत आहे. त्यानुसार वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. यासाठी टपाल कार्यालयात सुरक्षित बॉक़्समध्ये पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आतापर्यंत २ क्विंटल फराळ रवाना
डाक विभागाद्वारे दिवाळीनिमित्त सुरू केलेल्या या सुविधेद्वारे अनेकांनी विदेशात राहणाऱ्या आपल्या आप्तांसाठी ही सुविधा सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत जवळपास २ क्विंटल दिवाळी फराळ विदेशात पाठविला आहे.
"डाक विभागाद्वारे सुरू केलेल्या या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने परदेशात असणाऱ्या प्रियजनांही गावाकडील दिवाळीचा गोडवा अनुभवता येत आहे."
- श्रीकांत नवघरे, पोस्टल असिस्टंट मुख्य डाक कार्यालय अमरावती