रसायनाच्या आगीत संसाराची राखरांगोळी; अमरावती एमआयडीसीत महिलेचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:55 IST2026-01-07T12:53:22+5:302026-01-07T12:55:06+5:30
Amravati : राब राब राबणाऱ्या नवदाम्पत्याने हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्धेहून अमरावती गाठले. पंधरवड्यापूर्वीच नव्या ठिकाणी नोकरी शोधली.

Family's ashes destroyed in chemical fire; Woman dies of burns in Amravati MIDC
लोकमत न्यूज नेटवक
बडनेरा : राब राब राबणाऱ्या नवदाम्पत्याने हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्धेहून अमरावती गाठले. पंधरवड्यापूर्वीच नव्या ठिकाणी नोकरी शोधली. ती द्रव पदार्थ २५०, ५०० मिली पॅकमध्ये भरत होती, तर तो तेथेच गार्ड होता. याच रसायनाच्या ठिणगीने मोठा पेट घेतला आणि त्याच आगीत तिचा होरपळून मृत्यू झाला.
मोनाली व सुनील कोडापे (मु. पो. हरदोली, ता. आर्वी, जि. वर्धा) असे हे दाम्पत्य. तीन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात अमरावती शहर गाठले. संसाराचा कसाबसा गाडा ढकलणाऱ्या मोनालीने १५ दिवसांपूर्वीच एमआयडीसीमधील गोपी इंडस्ट्रीज येथे काम शोधले. प्लॉट क्रमांक डब्ल्यू २३ मधील सुमीत खंडेलवाल यांच्या या कंपनीमध्ये नागपूरहून मोठ्या ड्रममध्ये टर्पेटाईन आणून त्याचे लहान बाटल्यांमध्ये (२५० मिली, ५०० मिली) रिपॅकिंग करण्याचे काम केले जाते. त्याचा साठा लोखंडी ड्रममध्ये भरून ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी कंपनीमध्ये मोनाली व इतर सहा महिला कामावर आल्या. त्यांनी काम सुरू करण्याच्या काही वेळेतच टर्पेटाईनने पेट घेतला. मोनालीला बाहेर पडता आले नाही. आगीने क्षणात तिची राखरांगोळी केली.
कुटुंबीयांचा टाहो
मोनाली व सुनील यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. तीन वर्षांपूर्वी हे दोघेही कामाच्या शोधात अमरावती शहरात आले. मृत मोनालीचे माहेर यवतमाळ आहे. आगीच्या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची वार्ता कळतात मोठ्या संख्येत नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अक्षरशः टाहो सुरू होता. दुसरीकडे आगीतून कशाबशा बाहेर पडलेल्या सहा महिला कामगारांसह आगीपुढे असहाय्य ठरलेला मोनालीचा पतीदेखील धाय मोकलून रडत होता.
बंद शटरने केला घात
इमारतीला दोन शटर होते, ज्यापैकी केवळ एकच उघडे होते. प्रतिभा राऊत, उज्ज्वला सुखदेवे, मंजुळा रामटेके, वर्षा भगत, रोषनी मेहरे आणि शुभांगी ढोरे या सहा महिला उघड्या शटरच्या जवळ असल्याने त्या तातडीने बाहेर पडल्या आणि सुखरूप वाचल्या. मात्र, मोनाली ज्या बाजूला होत्या, तिथले शटर बंद होते. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न उरल्याने मोनाली यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेने औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सुमारे ३०० ते ४०० वर्गफुटांच्या या जागेत मोठ्या प्रमाणात टर्पेटाईनचे ड्रम साठवलेले होते. अशा धोकादायक आणि ज्वलनशील पदार्थाचे काम करताना अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन मार्ग असणे अनिवार्य आहे. मात्र, या घटनेत बंद असलेले शटर आणि अपुरा मोकळा मार्ग मोनालीच्या जिवावर बेतल्याचे समोर येत आहे.