इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करता येणार 'जलसंपदा' विभागात इंटर्नशीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:49 IST2025-01-30T10:49:02+5:302025-01-30T10:49:56+5:30

ना विद्यावेतन, ना मानधन : अवर सचिवांचे आदेश

Engineering students will be able to do internship in the 'Water Resources' department | इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करता येणार 'जलसंपदा' विभागात इंटर्नशीप

Engineering students will be able to do internship in the 'Water Resources' department

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठ व महाविद्यालयांत अभियांत्रिकीसाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता जलसंपदा विभागात इंटर्नशिप करता येणार आहे. राज्याच्या अवर सचिव राखी चव्हाण यांनी याबाबत १५ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत. मात्र, इंटर्नशिप करणाऱ्या कुठल्याही प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन किंवा मानधन दिले जाणार नाही.


अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जलसंपदा बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल हवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखनाबाबत माहिती व्हावी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.


या अनुभवाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटना या तीन संस्थांसह राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये 'आंतरवासिता' उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अन्वये शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आंतरवासिता 'इंटर्नशिप' उपक्रम हा महत्त्वाचा भाग असून, अभियांत्रिकी विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता लागू करण्यात आली आहे. यानुसार जलसंपदा विभागात प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाबाबतची माहिती अभियांत्रिकीविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होईल.


कोण राहील पात्र?
राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या (बीई किंवा बीटेक) तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी आंतरवासिता उपक्रमासाठी पात्र राहील. सोबतच, एमई किंवा एमटेकच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी आंतरवासिता उपक्रमासाठी पात्र असणार आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या आंतरवासितेची संरचना विद्यापीठाशी चर्चा करून करण्यात येईल.


ऑनलाइन नोंदणी
ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक राहील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, आवश्यक कौशल्य यांचा विचार करून मुलाखतीद्वारे निवडीसंदर्भात कार्यवाही संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर करण्यात येईल.

Web Title: Engineering students will be able to do internship in the 'Water Resources' department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.