डॉ. आंबेडकरांचे अंबादेवी सत्याग्रह परिषदेपुढे संबोधन

By Admin | Updated: November 12, 2014 22:36 IST2014-11-12T22:36:06+5:302014-11-12T22:36:06+5:30

अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नाही. नाशिकच्या काळारामाचे व अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेता येत नाही. या विषम व्यवस्थेविरूध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत

Dr. Address to Ambedkar's Ambadevi Satyagrah Parishad | डॉ. आंबेडकरांचे अंबादेवी सत्याग्रह परिषदेपुढे संबोधन

डॉ. आंबेडकरांचे अंबादेवी सत्याग्रह परिषदेपुढे संबोधन

त्र्यंबक ढोके - अमरावती
अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नाही. नाशिकच्या काळारामाचे व अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेता येत नाही. या विषम व्यवस्थेविरूध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेद्वारे सत्याग्रह, सभा, संमेलने, लेखनकार्य आदींद्वारे तुफान झंझावात सुरू केला. या दरम्यान त्यांनी अंबानगरीला १३ नोव्हेंबर १९२७ साली दुपारी १.३० वाजता भेट दिली होती. डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित अंबादेवी सत्याग्रह परिषदेला यावेळी बाबासाहेबांनी संबोधित केले.
१३ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बडनेरा येथे आगमन झाले. यावेळी दादासाहेब गवईंनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर स्थानिक इंद्रभुवन थिएटरमध्ये दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अंबादेवी सत्याग्रह परिषद सुरू झाली. या सभेला स्पृश्य, अस्पृश्य, सवर्णांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी १४ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर नागपूरचे वामराव घोरपडे, बॅ. नानासाहेब तिडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अमरावती देवस्थान कमिटीच्या निर्णयाविरूध्द झगडण्याचा निर्णय घेण्यात आला. या लढ्यात आर्वीचे दलपतसिंग चव्हाण, अमरावतीचे गोपाळराव देशमुख, चौबळ, खापर्डे, एस.वाय.पाटील, ठवरे, उत्तम कदम, संपत नाईक, राजाराम अकाती गायकवाड, पी.एच.तायडे, मोहोड, एस.पी.धंदर आदींसह अनेकांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीने या लढ्याला अधिक धार आली होती. सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेबांची सभा सुरू झाल्यानंतर मुंबईहून तार आली. त्यात १२ नोव्हेंबर रोजी १२ वाजता डॉ. आंबेडकरांचे वडीलबंधून बाळाराम उपाख्य दादासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्याची दु:खद वार्ता होती. परंतु बाबासाहेबांनी या दु:खद वार्तेने खचून न जाता सभा पुढे सुरू ठेवली. त्यावेळी अंबानगरीवासियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धैर्यशिल वृत्तीचा अनुभव घेतला.
(लेखक हे अमरावती येथील सद्धम्म प्रचार केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

Web Title: Dr. Address to Ambedkar's Ambadevi Satyagrah Parishad