जिल्हा सामान्य रुग्णालयात दूरदुरचे रुग्ण उपचार घेण्याकरिता येतात. त्यात मेळघाटसह मध्य प्रदेशातील महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांतील नागरिकांना अमरावतीला येणे सोयीचे वाटत असल्याने तेदेखील इर्विन रुग्णालयातच उपचारासाठी येत असल्याने सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वार्ड हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. मात्र, मनुष्यबळ तोकडा असल्याने कर्तव्यावरील आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येताना दिसत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ वॉर्ड आहेत. याव्यतिरिक्त आयसीयू विभाग आणि कॅजुल्टी आहे. सर्पदंश, श्वानदंश, विष प्राशन केलेले, अपघाताचे रुग्णदेखील येथे तातडीने भरती होतात. अतिदक्षता विभागात सहा वॉर्ड असून सर्व बेडवर, तसेच इतर वार्डातीलही सर्व बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने काहींना वेळेत औषध पुरवठा होण्यास विलंब होत असल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांकडून उमटत आहे.
बॉक्स
डेंग्यूचा वाढता प्रकोप
जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांचा शासकीय रुग्णालयातील एकूण आकडा ३६८ वर पोहचला आहे. यात महापालिका हद्दीतील ११८ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, खासगी रुग्णालयात याहीपेक्षा अधिक रुग्ण उपचारा घेत असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोट
सध्याचे वातावरण आरोग्य बिघडण्यास पोषक असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच डेंग्यूचाही प्रकोप थांबलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक