बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:06 IST2026-04-03T16:59:32+5:302026-04-03T17:06:55+5:30
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर आपल्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्याने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर आपल्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्याने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या खुनाच्या कटाचे 'ऑडिओ रेकॉर्डिंग' आपल्याकडे असल्याचा दावा तायडे यांनी केला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार प्रवीण तायडे यांनी माध्यमांशी बोलताना स्फोटक माहिती दिली. तायडे यांच्या मते, निवडणुकीतील पराभव बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागला आहे. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांनी तायडे यांच्या भावाविरोधात खुनाचे षडयंत्र रचले आहे. "माझ्या भावाच्या हत्येचा कट कसा रचला गेला, याची संपूर्ण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे," असा दावा तायडे यांनी केला.
"पराभव पचवणे बच्चू कडू यांना कठीण जात आहे. त्यामुळेच ते माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे कोणाविरोधात कट रचला आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे." तायडे यांनी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गांभीर्याने करावा, अशी मागणी केली आहे.
या ऑडिओ क्लिपच्या दाव्यामुळे बच्चू कडू यांच्याभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. "हा प्रकार अत्यंत गंभीर असून बच्चू कडू यांना तात्काळ अटक करावी," अशी मागणी आमदार तायडे यांनी केली आहे. या आरोपामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
प्रवीण तायडे यांच्याकडे असलेली ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे? त्यामध्ये कोणाचे आवाज आहेत? आणि पोलिसांनी यावर काय पाऊल उचलले आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.