चांदूर रेल्वेत उर्दू माध्यमाचे ११ वी, १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:27 IST2025-07-01T15:26:20+5:302025-07-01T15:27:03+5:30

Amravati : चांदूर रेल्वे येथील नागरिकांचे आमदार प्रताप अडसड यांना निवेदन

Demand to start Urdu medium 11th and 12th college education in Chandur Railway | चांदूर रेल्वेत उर्दू माध्यमाचे ११ वी, १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्याची मागणी

Demand to start Urdu medium 11th and 12th college education in Chandur Railway

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे :
शहरात ११ वी, १२ वीच्या उर्दू माध्यमाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करा, अशा मागणीचे निवेदन स्थानिक मुस्लीम समुदायातर्फे आमदार प्रताप अडसड यांना शनिवारी नगर परिषद मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत देण्यात आले.


शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते. असे असताना शहरासह तालुक्यातील उर्दू माध्यमाचे विद्यार्थी मात्र महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहे. चांदूर रेल्वे शहरात दोन हजारांच्या जवळपास मुस्लीम समाजाची लोकसंख्या आहे. याशिवाय ग्रामीण भागातही मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. शहरात स्थानिक नगर परिषदद्वारा संचालित मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा असून, येथे दहावीचे शिक्षण आहे. 


मात्र, चांदूर रेल्वे तालुक्याचे ठिकाण असतानाही याठिकाणी केवळ दहावीपर्यंत उर्दू माध्यमाचे शिक्षण आहे. परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकत नाही. तसेच धामणगाव मतदारसंघात तिन्ही तालुक्यांत उर्दू माध्यमाचे विज्ञान महाविद्यालय नसून, हे महाविद्यालय चांदूर रेल्वे शहरात झाल्यास त्याचा लाभतिन्ही तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होऊ शकतो. याबाबत अनेकवेळा निवेदने देऊन उर्दू माध्यमाचे ११ वी, १२ वी चे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. अशातच ११, १२ वर्षापूर्वी एक वेळा यासंदर्भात नगर परिषदमध्ये ठराव घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी पुढे झालेली नाही. यावेळी आ. प्रताप अडसड यांनी सकारात्मक चर्चा नागरिकांसोबत केली. निवेदन देतेवेळी परवेज आलम, मोहम्मद इम्रान, राजीक शेख, सैय्यद ऐजाज, सैय्यद कैस, अजहर हुसैन, वाजीद खान, आमीर पठान, शेख सोहेल शेख रहीम, इम्रान सौदागर, अब्दुल फहीम, शहेजाद पठाण, शेख गफ्फार, नुरुल हसन कुरैशी, सैय्यद जाकीर, युसुफ सौदागर, इरफान कुरैशी यांच्यासह भाजप शहराध्यक्ष नंदा वाधवानी, माजी नगरसेवक अजय हजारे, पप्पू भालेराव आदींची उपस्थिती होती.

Web Title: Demand to start Urdu medium 11th and 12th college education in Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.