Crime : 'लघुशंकेसाठी थांबलात की मी मागून.. ' घराची छपाई करणाऱ्या मिस्त्रीच्या प्रेमात पडली पत्नी; प्रियकराला बोलावून केला निष्पाप पतीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:18 IST2025-11-14T17:17:17+5:302025-11-14T17:18:08+5:30
Amravati : टीम क्राइमने घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे. चंद्रपूरला खासगी काम करणारा प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होता, तर छाया ही सात वर्षापासून माहेरी राहत होती.

Crime : 'If you stop for urine, I will attack..' Wife fell in love with the house's constuctor; Called her lover and killed her innocent husband
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वर्षभरापूर्वी त्याने तिच्या घराची 'छपाई' केली. त्या कालावधीत ती चक्क 'त्या' मिस्त्रीच्या प्रेमात पडली. त्या विवाहबाह्य संबंधांची तिच्या पतीला कुणकुण लागली. थोडे वादही झाले अन् तिने त्या अवघ्या वर्षभराच्या कथित प्रेमापोटी नवऱ्याचाच काटा काढण्याचे ठरविले. कटानुसार, प्रियकराला अमरावतीत बोलावून घेतले अन् ठरल्याप्रमाणे तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याचा गेम केला. नवरा जिवाने गेला अन् ते दोघेही थेट हवालातीत पोहोचले. बडनेरा हद्दीत बुधवारी रात्री उघड झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी ही धक्कादायक उकल केली.
हनुमान गढी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात १२ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रमोद बकाराम भलावी (४२, रा. कारला, ता. चांदूर रेल्वे, ह. मु. अंजनगाव बारी) अशी मृताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासात 'टिम क्राईम'ने ही उकल केली. गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली अन् अवघ्या आठ तासांत मृताची पत्नी छाया व तिचा प्रियकर विश्वंभर दिगांबर मांजरे (३९, रा. विश्वी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांना अटक करून गुरूवारी या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला.
टीम क्राइमने घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे. चंद्रपूरला खासगी काम करणारा प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होता, तर छाया ही सात वर्षापासून माहेरी राहत होती. त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून, त्यांना दोन मुलेदेखील आहेत. तू पतीला सोबत घेऊन अंजनगाव बारीकडे निघ. मी आधीच जंगल परिसरात जाऊन दडतो. लघुशंकेसाठी थांबलात की मी मागून वार करतो, असे विश्वंभरने ठरवले. त्यानुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री ती दस्तूरनगर परिसरात थांबली. तेथून तिने पती प्रमोद याला फोन करून बोलावले. त्या कॉलमुळे प्रमोद रात्री दहाच्या सुमारास घरून दस्तूरनगरला आपल्या दुचाकीने पोहोचला. जंगल परिसरातील रोडवर छायाने पतीला दुचाकी थांबविण्यास सांगितले. छाया व प्रमोद दोघेही दुचाकीहून उतरताच जंगलात दडून बसलेल्या विश्वंभरने प्रमोदच्या मानेवर कोयत्याने वार केले.
पतीचे सिमकार्ड तोडले
प्रमोद मेल्याची खात्री झाल्यानंतर दोघांनीही त्याचा मृतदेह नाल्याशेजारी नेऊन टाकला. त्याची दुचाकीदेखील तेथेच टाकली. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दोघांनीही प्रमोदच्या मृत चेहऱ्यावर दगडाने अनेक वार केले. तथा रात्री १०:५० च्या सुमारास दोघेही अंजनगाव बारी येथे पोहोचले. पतीचा मोबाइल स्वतःजवळ घेत छाया हिने त्यातील सिमकार्ड तोडून फेकून दिले; आरोपीने रात्रभर छायाच्या घरी मुक्काम केला. ११ नोव्हेंबरला गाव गाठले.
पत्नीनेच रचला कट, नेरपिंगळाई घेतले दर्शन
आपल्या संबंधांची पती प्रमोद याला कुणकुण लागली आहे. तो आणि त्याची एक महिला नातेवाईक आपल्याला दररोज त्रास देत आहे. त्यामुळे आता त्याला संपवावेच लागेल, असे छाया हिने प्रियकर विश्वंभर याला सांगितले. तो १० नोव्हेंबर रोजी दुपारी अमरावतीत आला. दोघांनीही दस्तूरनगर येथे हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर नेरपिंगळाई येथे जाऊन दोघांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळच्या सुमारास अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी बाजारातून कोयता विकत घेतला.
"आरोपी पत्नीनेच पतीच्या मिसिंगची तक्रार नोंदविली होती. मात्र पती नेमका कुणासोबत बाहेर पडला, याबाबत तिने चुकीची माहिती दिली. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांनाही अटक केली. दोघांनीही खुनाची कबुली दिली."
- संदीप चव्हाण, प्रमुख, गुन्हे शाखा