कोरोना इफेक्ट; कारागृहात ‘मार्क आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:59+5:30
अमरावती मध्यवर्ती कारागृहात ११०० पेक्षा अधिक महिला, पुरूष बंदीजन आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या कारागृहात बंदीजनांची आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार कारागृहात होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सकाळी चहा, फराळ घेताना दोन बंदीजनांमध्ये तीन फुटांचे अंतर बंधनकारक केले आहे. दुपारी व सायंकाळी जेवतानासुद्धा हीच नियमावली लागू झाली आहे.

कोरोना इफेक्ट; कारागृहात ‘मार्क आऊट’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांना ‘मार्क आऊट’ सूचना केल्या आहेत. एकमेकांशी संपर्क, संवाद करताना किमान तीन फुटांचे अंतर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात ११०० पेक्षा अधिक महिला, पुरूष बंदीजन आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या कारागृहात बंदीजनांची आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार कारागृहात होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सकाळी चहा, फराळ घेताना दोन बंदीजनांमध्ये तीन फुटांचे अंतर बंधनकारक केले आहे. दुपारी व सायंकाळी जेवतानासुद्धा हीच नियमावली लागू झाली आहे. प्रत्येक बराकीत विश्रांती अथवा रात्री झोपताना बंदीजनांना किमान तीन फुटांचे अंतर ठेवावे लागत आहे. प्रत्येक बराकीत कोरोना ईफेक्ट जाणवत असून, बंदीजनांनीसुद्धा स्वंयस्फूर्तीने अंमलबजावणी चालविली आहे. ग्रंथालय, दळण केंद्र, कार्यालयीन कामकाज, स्वच्छतेची कामे, असे विविध कर्तव्य बजावताना बंदीजनांना तीन फूट अंतर ठेवावेच लागत आहे. हल्ली कारागृहात कोरोना विषाणू संदर्भात कटाक्षाने काळजी घेण्यात येत आहे.
खुले कारागृहातील बंदीजनांना नियमावली लागू
अमरावती मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृहाची शिक्षा भोगत असलेले ४४ बंदीजन आहेत. त्यांना नियमित बाहेर येऊन विविध कर्तव्य बजावावे लागतात. मात्र, कारागृह प्रशासनाने खुले कारागृहाच्या बंदीजनांनासुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. कारागृहाबाहेर शेतीची कामे, स्वच्छता, पशू चराई यासह अन्य कामे करताना आरोग्याची काळजी घेण्याबाबत अवगत करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.