लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:38 IST2025-05-14T17:37:46+5:302025-05-14T17:38:43+5:30
Amravati : वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती

Congress leader's son goes missing a day before wedding
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लग्नाच्या एक दिवसापूर्वी मंगळवारी सकाळी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नियोजित वर बेपत्ता झाल्याने दोन्ही बाजूला खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनुसार, वैभव मोहोड हा नियोजित वर शहरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात लिपिक आहे, तर हरिभाऊ मोहोड हे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.
अमरावती येथील एका मंगल कार्यालयात वैभवचा बुधवार, १४ मे रोजी विवाह सोहळा होता. त्यानिमित्त घरी लगबग होती. बाहेरून काही साहित्य आणायचे आहे, ते घेऊन येतो, असे सांगून वैभव सकाळी घराबाहेर पडला. मात्र, सायंकाळ होत आली तरी परतला नसल्याने वरपित्याने म्हणजेच हरिभाऊ मोहोड यांनी फ्रेजरपूरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यादरम्यान वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती पुढे आली. याबाबत शहरात विविध चर्चा होत आहेत. फ्रेजरपुरा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
"वैभव मोहोड बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून तपास होत आहे."
- नीलेश करे, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा