अमरावती: फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सिआयडीकडे सोपिवण्यात आला आहे. अमरावती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी शनिवारी याप्रकरणाशी संबंधित संपुर्ण सिसिटिव्ही फुटेज जप्त केले आहे.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास अनिल मुळे हे शेगाव रहाटगाव रिंगरोडवरील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी एका आप्ताशी केलेला संवाद ऑडिओ क्लिप म्हणून व्हायरल झाला होता. तर, याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वजा तक्रार मुळे यांच्या कटुंबियांकडून नांदगाव पेठ पोलिसांत करण्यात आली. त्याअनुषंगाने सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्याकडे मुळे यांच्या आकस्मिक मृत्यूचा तपास देण्यात आला. याप्रकरणी मुळे यांच्या होमटाऊनमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यादरम्यान या आत्महत्याप्रकरणाचा तपास सिआयडीकडे सोपिवण्यात यावा, अशी मागणी बुलंद करण्यात आली होती. त्या जनरेट्यामुळे तोे तपास अमरावती सिआयडीकडे सोपविण्यात आला. त्याअनुषंगाने डीवायएसपी ब्राम्हणे यांनी शनिवारी पोलीस आयुक्तालयातून संबंधित तारखांचे फुटेज ताब्यात घेतले.
मोबाईल, लॅपटॉपही ताब्यात
मुळे आत्महत्याप्रकरणाशी संबंधित संपुर्ण कागदपत्रे, त्यांचा मोबाईल व लॅपटॉप देखील ताब्यात घेण्यात आला आहे. त्यातील डेटा जैसे थे आहे की डिलिट करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी त्या वस्तृू नागपूरस्थित फॉरेन्सिक लॅबला पाठविल्या जाणार असल्याची माहिती डीवायएसपी ब्राम्हणे यांनी ‘लोकमत’ला दिली.