अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात चेन्नईच्या ताडीचा गूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:19 IST2021-02-09T14:18:13+5:302021-02-09T14:19:34+5:30

Amravati News चहासह इतर काही पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरणाऱ्यांचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात वाढले आहे. अशाच चेन्नई येथील ताडीचा गूळ अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांत विक्रीला आला आहे.

Chennai palm jaggery in Paratwada area of Amravati district | अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात चेन्नईच्या ताडीचा गूळ

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात चेन्नईच्या ताडीचा गूळ

ठळक मुद्देचव जरा वेगळीच रस्त्यावर थाटली दुकाने

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : चहासह इतर काही पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरणाऱ्यांचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात वाढले आहे. अशाच चेन्नई येथील ताडीचा गूळ अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांत विक्रीला आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी थाटलेली ही गुळाची दुकाने लक्षवेधी ठरली आहेत.

             शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोरोनाकाळात अनेक नागरिक बिनदुधाच्या गुळाच्या चहाकडे वळले. एरवी संक्रांतीला तीळगूळ तयार करण्यासाठी शहरी संस्कृतीत येणारा गूळ आता महिन्याच्या किराणा यादीत परतला आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील गूळ प्रसिद्ध असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अशातच चेन्नईसारख्या परराज्यातून आलेल्या ताडीच्या गुळाची चव घेण्यासाठी रस्त्यावरील या दुकानांवर अनेकांची पावले थबकू लागली आहेत.

चेन्नईचा मुरलीधरन बोलतो मराठीत

चेन्नई येथून ताडीचा गूळ विक्रीसाठी आणणारा मुरलीधरन दोन प्रकारच्या गुळाची विक्री करतो. अष्टमासिद्धी नजीक दिवसभर रस्त्याने ये-जा करणाऱ्या ग्राहकांशी मोडक्यातोडक्या मराठी भाषेत संवाद साधतो. लहान आणि मोठ्या आकारात बांबूच्या टोपलीत या गुळाच्या भेल्या ठेवल्या आहेत. एका ट्रकमध्ये हा संपूर्ण माल भरून सहा ते सात सहकारी विविध ठिकाणी दुकाने थाटून विक्री करीत आहेत.

--------------------

Web Title: Chennai palm jaggery in Paratwada area of Amravati district