करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: February 14, 2023 18:28 IST2023-02-14T18:27:49+5:302023-02-14T18:28:21+5:30
गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली.

करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल
वरूड (अमरावती) : गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील करजगाव गांधीघर येथे घडली. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास घडलेल्या या प्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला. शंकर सखारामजी अढाऊ (८३, रा.करजगाव गांधीघर )असे मृताचे नाव आहे. आरोपींनी त्यांच्या घरातून ५ ग्रॅम सोन्याचा दागिणे लंपास केले.
पोलीस सूत्रानुसार, शंकर अढाऊ व पत्नी सुलोचना हे दाम्पत्य सोमवारी रात्री जेवण करून झोपी गेले होते. रात्री ११ च्या दरम्यान अज्ञात तीन जण तोंडाला कापड बांधून त्यांच्या घरात शिरले. वृद्धेचे तोंड दाबून तिचे डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकाने वृद्धावर धारदार वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला. तर वृध्देच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. तर कानातले निघत नसल्याने कान कापण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड होताच आरोपी पळून गेले. माहिती मिळताच बेनोडा ठाणेदार स्वप्नील ठाकरे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्यासह बेनोडा पोलिसांचा ताफा करजगावात दाखल झाला. पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ निलेश पांडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. आरोपीच्या शोधाकरिता श्वान पथक, ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले.
दत्तक मुलगा घराबाहेर
अढाऊ दाम्पत्याचा दत्तक मुलगा विशाल सोमवारी रात्री बाहेर गेला होता. याच वेळी गावात ब्रह्मलीन दस्तगीर महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरु असल्याने ग्रामस्थ त्यात व्यस्त होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अढाऊ यांच्या घराकडे धाव घेतली. तर वृध्देच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञातांविरूध्द खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गळ्यातील मंगळसूत्र काढल्यानंतर कानातील दागिने काढण्याकरिता कान कापून काढा, असे ऐकल्यानंतर आपण जीवाच्या आकांताने ओरडलो, त्यामुळे आरोपी पळाल्याचे वृध्देने म्हटले आहे.
कोटती घटना चोरी करण्याच्या उद्देशाने घडली असावी. यामध्ये वृद्धाला धारदार वस्तूने मारून ठार करण्यात आले. तर ५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन चोर पसार झाले. त्या अज्ञात तिन आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. - स्वप्नील ठाकरे, ठाणेदार, बेनोडा