अमरावती विद्यापीठाचा सावळागोंधळ; 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाच्या पेपरमध्ये चक्क 'सायबर लॉ'चे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:48 IST2025-10-28T12:41:40+5:302025-10-28T12:48:35+5:30
Amravati : अमरावती विद्यापीठात विधी अभ्यासक्रमात सावळागोंधळ; विद्यार्थी संघटनांची तक्रार

Amravati University's controversy; Questions on 'Cyber Law' in 'Contract' paper
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. हिवाळी परीक्षा २०२५ मधील विधी अभ्यासक्रमाच्या कॉन्ट्रॅक्ट भाग २ या विषयाच्या पेपरऐवजी विद्यार्थ्यांना सायबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. परिणामी सोमवारी परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी ही बाब तातडीने केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. पेपर तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारानंतर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १५ ऑक्टोबरपासून प्रारंभझाला आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर वेळापत्रकानुसार सोमवार, २७ऑक्टोबरपासून पूर्ववत परीक्षा सुरू झाल्या. सकाळी ९ ते १२ या वेळेत एलएल.बी. तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सेमिस्टर-२ चा कॉन्ट्रॅक्ट-२ या विषयाचा पेपर होता. मात्र, या प्रश्नपत्रिकेत 'सायबर ला'या विषयाचे प्रश्न असल्याचे बघून परीक्षार्थी गोंधळून गेले.
परतवाडा येथील सी. एम. कढी महाविद्यालयात हा प्रकार सर्वात अगोदर लक्षात आला. त्यानंतर परीक्षार्थीनी पुढाकार घेत या गोंधळाबाबत केंद्र प्रमुखांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर विधि अभ्यासक्रमाच्या 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाच्या पेपरला 'सायबर'चे प्रश्न विचारण्यात आल्याचे वास्तव पुढे आहे.
नेमका हा प्रकार कसा, कोणी केला? याचा शोध घेतला जाणार आहे. मात्र, विद्यापीठ परीक्षांचे कामकाज 'ए टू झेड' ऑनलाइन असताना प्रश्नपत्रिका चुकीची कशी पाठविण्यात आली, हा आता संशोधनाचा विषय ठरणार आहे. या प्रकरणी विषयवार तज्ज्ञ समिती (मॉड्रेटर) दोषी असल्याचे बोलले जात आहे.
एलएल.बी. प्रश्नपत्रिका देताना झाला सावळागोंधळ
चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा नियंत्रकांना निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत अवगत केले आहे. विशेष सूट देण्याची मागणी केली आहे. - अॅड. आकाश हिवराळे, विदर्भ सरचिटणीस रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद
प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव योग्य, पण प्रश्न दुसरेच
एलएल.बी.३ वर्षीय विद्यार्थ्यांना सोमवारी परीक्षेच्या प्रारंभी कॉन्ट्रॅक्ट-२ या विषयाची प्रश्नपत्रिका हाती पडली. पेपरवर विषयाचे नाव कॉन्ट्रॅक्ट-२ असले तरी प्रश्नपत्रिकेत 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाऐवजी 'सायबर लॉ'चे प्रश्न विचारण्यात आले होते.
"एलएल.बी. अभ्यासक्रमाच्या 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाच्या पेपरला 'सायबर ला'चे प्रश्न विचारण्यात आल्याची बाब सोमवारी निदर्शनास आली. याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारीसुद्धा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हिवाळी परीक्षेच्या शेवटी या विषयाचे पेपर नव्याने घेण्यात येतील. चूक कुठे झाली, कोणी केली? यासंदर्भात चौकशी केली जाणार आहे."
- डॉ. नितीन कोळी, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ.