पोलिसांच्या मॅराथॉनमध्ये धावले अमरावतीकर
By प्रदीप भाकरे | Updated: August 17, 2025 14:53 IST2025-08-17T14:53:35+5:302025-08-17T14:53:49+5:30
ऑपरेशन वाईप आऊट : से नो ड्रग्स, टी शर्टवरील मजकूर ठरला लक्षवेधक

पोलिसांच्या मॅराथॉनमध्ये धावले अमरावतीकर
अमरावती: शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन वाईप आऊट’ अंतर्गत रविवारी (दि.१७ ऑगस्ट) मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या मॅराथॉनमध्ये शेकडो अमरावतीकर सहभागी झाले. अमरावती शहरातील तरूण पिढीमध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
येथील पोलिस कवायत मैदानाहून सकाळी ७ च्या सुमारास या मॅरेथॉनला सुरूवात झाली. तथा सकाळी ८.३० वाजता कवायत मैदानावरच स्पर्धेची सांगता झाली. यात शहरातील अंदाजे ३०० ते ४०० युवक, युवती तसेच मॅरेथॉन रनर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणा-या दुष्परिणामाबाबत उत्तम प्रकारे जनजागृती होण्यास मदत झाली. यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त श्याम घूगे व रमेश घुमाळ यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, संजय खताळे व कैलास पुंडकर, दहा पोलिस ठाणे, सायबर ठाणे, तथा एकुणच अन्य शाखेतील अधिकारी, अंमलदार तसेच महिला पोलिस अंमलदारांनी सहभाग नोंदवला.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धकांना देण्यात आलेल्या टी शर्टवरील मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुरूवातीला पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. पोलीस बॅंडच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीताने सांगता करण्यात आली. यापुढे देखील पोलिस आयुक्तालयाच्या वतीने जनजागृतीपर उपक्रम राबवून व त्यामध्ये जनतेचा सहभाग घेवून जनजागृती केली जाणार आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हान यांनी अंमली पदार्थांच्या समुळ उच्चाटनासाठी पुढाकार घेतला आहे.