अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९१.४३ टक्के; वाशिम अव्वल, अकोला माघारले
By गणेश वासनिक | Updated: May 5, 2025 14:46 IST2025-05-05T14:44:46+5:302025-05-05T14:46:34+5:30
यंदा मुलींनीच मारली बाजी : ६३ हजार ३५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण; ९४.२९ टक्के मुलींच्या निकालाची टक्केवारी

Amravati division's 12th result 91.43 percent; Washim tops, Akola retreats
गणेश वासनिक
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९१.४३ टक्के लागला असून, उत्तीर्णतेच्या टक्केवारीत विभागातून वाशिम जिल्हा अव्वलस्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९३ टक्के लागला होता, यंदा त्यात २ टक्क्यांची यंदा घट असली, तरी राज्यात निकालाच्या क्रमवारीत अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे.
निकालाच्या टक्केवारीत विभागात वाशिम जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून, या जिल्ह्याचा निकाल ९५.६६ टक्के, अकोला ८४.२८, यवतमाळ ९०.६३, अमरावती ९१.०५, बुलडाणा ९५.१८ टक्के लागला आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण एक लाख ४६ हजार १४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एक लाख ४५ हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण एक लाख ३२ हजार ८१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.४३ इतकी आहे. अमरावती विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.६९ टक्के, कला शाखेचा ८२.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.०४ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ७५.८८ टक्के, तर टेक्निकल सायन्स ९१.९५ टक्के इतका लागला आहे.
उत्तीर्णतेच्या बाबतीत यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६७ हजार १८८ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ६२ हजार ३५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९४.२९ टक्के आहे, तर ७८ हजार ०६९ मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६९ हजार ४६२ मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ८८.९७ टक्के इतकी आहे.