Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:16 IST2025-12-23T16:05:37+5:302025-12-23T16:16:08+5:30
अमरावतीमध्ये एका तरुणीवर तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचे, दोन वेळा तिचा गर्भपात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
Amravati Crime News: एका तरुणीला प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचा दोनदा गर्भपात घडवून आणला गेला. मात्र, त्यानंतरही आरोपीने लग्नासाठी नकार दिल्याची धक्कादायक घटना रहाटगाव परिसरातील वृंदावन कॉलनी भागात उघड झाली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी आरोपी धनंजय विनोद टाले (२१, रा. किर्तीनगर, अकोला) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ दरम्यान ती लैंगिक अत्याचाराची मालिका घडली. एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्या तरुणीची धनंजयशी ओळख झाली होती. पुढे त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्यात प्रेम संबंध जुळले.
दोन दिवस तिच्या घरी थांबला
जानेवारी २०२४मध्ये फिर्यादी तरुणी ही घरी एकटीच असताना आरोपी तिच्या रूमवर दोन दिवस मुक्कामी राहिला. त्यावेळी आपण लग्न करू, असे म्हणून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान फिर्यादी तरुणी ही दोनदा गर्भवती राहिली.
आता गर्भपात कर, नंतर आपण लग्न करू
त्यावेळी आपण लग्न करूच मात्र आता तू गर्भपात करून घे, असे म्हणत त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. त्यामुळे फिर्यादी तरुणीचा दोनदा गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
...तो तिला टाळू लागला
फिर्यादीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, आपले वय कमी असल्याचा दाखला देत त्याने लग्नास नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने नांदगाव पेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश वाकडे हे करीत आहेत.