लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरी विमानसेवा महासंचालनालयाने (डीजीसीए) गुरूवारी अमरावतीविमानतळाला एअरोड्रोम परवाना दिला असून आता बेलोरा विमानतळ अधिकृतपणे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्किम (आरसीएस) मधील परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जाहीर केले.
या घोषणेने अमरावतीकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आधी वचन दिल्याप्रमाणे या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बेलोरा विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण करील, याचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. अमरावती-मुंबई-अमरावती या मार्गावर अलायन्स एअरलाईन्सचे विमान आठवड्यातून तीन दिवस प्रवाशांना सेवा देईल, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोषणेची सुरूवात 'गुड न्युज ऑन होली, मेजर माईलस्टोन फॉर महाराष्ट्र' अशी केली असून ही नवीन युगाची सुरूवात आहे. बेलोरा विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेतील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला झाला आहे. यामुळे अमरावती व लगतच्या जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळेल. पर्यटन विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून येत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे.
आठवड्यातून तीनदा सेवायेत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी दिल्याने आता अमरावतीकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही सेवा देईल.
एटीआर ७२ आसनी विमान सेवापॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असून, अमरावतीहून लवकरच पूर्ण व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी अनेक सुरक्षाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे.
कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्णअमरावती विमानतळावर नुकतीच 'एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर' अर्थात 'पीएपीआय' चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उड्डाण केलेल्या बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानावर भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले. या विमानाने २६/०८ धावपट्टीवरून अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि त्याचे कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केले होते.