अपघातानंतर पीएसआय पुत्राला शासकीय वाहनाने घरी सोडण्याची सोय ! ठाणेदारांवर मृताच्या नातेवाइकांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:35 IST2025-09-30T19:34:51+5:302025-09-30T19:35:38+5:30
मृताच्या नातेवाइकांची तक्रार : गुन्हा नोंदविण्याआधीच दोघांनाही सोडले

After the accident, PSI's son was allowed to go home in a government vehicle! Serious allegations by the relatives of the deceased against the police station chief
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी येथील सिंभोरा रोडवरील खुल्या कारागृहासमोर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात हेमंत निंभोरकर (५१, रा. लिंगापूर ता. आष्टी. जि. वर्धा) यांचा मृत्यू झाला. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० च्या सुमारास तो अपघात घडला. मात्र, मोर्शीच्या ठाणेदारांनी हेमंत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पीएसआय पुत्राला वाचविण्यासाठी प्रचंड टोलवाटोलव केली. एवढेच काय, तर गुन्हा दाखल करण्यापूर्वीच शासकीय वाहनाने त्याच्यासह त्याच्या मैत्रिणीलादेखील कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याचा आरोप मृताचे नातेवाईक सचिन होले यांनी केला.
मोर्शी पोलिसांनी ठाणेदारांविरुद्धची ती तक्रार चौकशीत ठेवली आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद व मोर्शीचे एसडीपीओ याप्रकरणात ठाणेदार व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध नेमकी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. शनिवारी दुपारीच आर्वीचे आमदार सुमित वानखडे यांनी मोर्शी ठाणे गाठून ठाणेदारांना जाब विचारल्यानंतर यात त्या पीएसआय पुत्राविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. यश शिवराज पवार (२२, रा. शेगाव नाका अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील शिवराज पवार हे मोर्शी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक आहेत. मोर्शी पोलिसांनी हेमंत यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या यश पवार याला संरक्षण दिल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला.
ठाणेदार आठवलेंचा बचावात्मक पवित्रा
आरोपी मुलगा व त्याच्यासोबतची मुलगी भेदरली होती. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन आलो. त्याची ओळख पटली असल्याने तो कुठे पळून जाणार नव्हता, तोही जखमी होता, असे ठाणेदार म्हणाले.
मोर्शी ठाणे गाठल्यानंतर ठाणेदारांनी त्या पोलिसपुत्राविरुद्ध गुन्हा नोंदविला. ठाणेदाराची ती टोलवाटोलवी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली. अपघातातील आरोपीला खास ट्रिटमेंट देणाऱ्या ठाणेदार व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न केल्यास आगामी अधिवेशनात त्यावर लक्षवेधी दाखल करू.
- सुमित वानखडे, आमदार, आर्वी
"याप्रकरणाची चौकशी एसडीपीओंकडे सोपविली आहे. ठाणेदारांनी आरोपीला विशेष ट्रिटमेंट दिली का किंवा कसे, ते अहवालातून स्पष्ट होईल. दोषी आढळल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल."
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक