दारूबंदी कारवाईदरम्यान आढळले पाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने
By Admin | Updated: August 2, 2016 23:57 IST2016-08-02T23:57:10+5:302016-08-02T23:57:10+5:30
दारुबंदी कायद्यांतर्गत संयुक्त कारवाईदरम्यान आरोपीच्या घरात तब्बल ४ लाख ८० हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज आढळून आला.

दारूबंदी कारवाईदरम्यान आढळले पाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने
कारवाई : १६ हजार ८०० रुपयांची दारू नष्ट
अमरावती : दारुबंदी कायद्यांतर्गत संयुक्त कारवाईदरम्यान आरोपीच्या घरात तब्बल ४ लाख ८० हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला असून घटनास्थळी आढळलेली १६ हजार ८०० रुपयांची गावठी दारू नष्ट केली आहे.
शहरात अवैध दारूचा महापूर असल्याचे पोलिसांच्या कारवाईमुळे उघड होत आहे. या अवैध दारू व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पुढाकार घेऊन कारवाईचा सपाटा लावला आहे. काही दिवसांत अनेक ठिकाणी हे धाडसत्र राबवून लाखोंची अवैध दारू जप्त केली. मंगळवारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे व फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या पथकाने धाडसत्र राबविले. पोलिसांनी पारधीपुरा, परिहारपुरा व कुंभारवाड्यातील पाच ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात पोलिसांनी गावठी दारूचा साठा नष्ट केला. मोहिमेत दारू व्यवसाय करणारी नंदा देवीदास भारद्वाज हिच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. त्यावेळी ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७६ ग्रॅमचे चांदीचे दागिने आढळून आले. या सोन्या-चांदीच्या ऐवजासंबंधी महिलेला विचारणा केली असता तिने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविला आहे.
दारूबंदी कायद्यान्वये अवैध दारू अड्ड्यावर धाडसत्र राबविले. त्यामध्ये गावठीचा मोठा साठा नष्ट करण्यात आला. याच कारवाईदरम्यान एका महिला दारूविक्रेत्याच्या घराची झडती घेतली असता तेथे सोन्या-चांदीचे दागिने संशयास्पद स्थितीत आढळून आले, ते जप्त करण्यात आले आहे.
- अनिल किनगे,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा