अमरावतीत १६ ऑक्सिजन प्लांट बंद; सिलिंडर खरेदीवर कोट्यवधींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:10 IST2026-01-21T16:09:20+5:302026-01-21T16:10:42+5:30
Amravati : कोरोनाकाळात उभारले होते प्लांट, दिवसाला १३.३६ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता

16 oxygen plants closed in Amravati; Crores spent on purchasing cylinders
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या आवारात एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते; परंतु पाच वर्षांपासून यातील एकही प्लांट कार्यान्वित केलेला नाही. त्यामुळे आजही शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षी ऑक्सिजन सिलिंडरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. अशा स्थितीत प्लांटचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला होता. यावेळी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी सरकार तसेच पीएम केअर फंड, तसेच इतर निधीतून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयांच्या आवारात १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. या सर्व ऑक्सिजन प्लांटची दिवसाला १३.३६ मेट्रिक टन अन् ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या ऑक्सिजन प्लांटचा वापरच झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत आजही बाहेरून ऑक्सिजन सिलिंडरचीच खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली.
या ठिकाणी आहेत ऑक्सिजन प्लांट
अमरावती, धारणी, तिवसा, चांदूर बाजार, बेनोडा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, मोर्शी, गुरुकुंज मोझरी, दर्यापूर, अचलपूर येथील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.
टेक्निशियनची आवश्यकता
जिल्हात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी तसेच त्यांच्या मेंटनन्ससाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच रुग्णालय प्रशासनाला मिळालेला नाही.
ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता (मेट्रिक टन)
रुग्णालयातील प्लांट निर्मिती क्षमता
उपजिल्हा रुग्णालय, धारणी ०.३९
उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ०.३९
ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार ०.३९
बेनोडा (वरुड) पीएचसी ०.३९
जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती १.८७
ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडे. ०.३९
ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ०.३९
सुपर हॉस्पिटल ०.९४
सुपर हॉस्पिटल ०.२४
ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे ०.२४
उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी ०.९४
सुपर हॉस्पिटल १.८७
आयुर्वेद महाविद्यालय, मोझरी १.८७
उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर ०.३७
इर्विन रुग्णालय १.१२
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय १.८७
खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट
कोविडकाळात परतवाडा येथील कृती रुग्णालयात १.५० मेट्रिक टन, दयासागर रुग्णालयात ०.२४ मेट्रिक टन, तर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ०.२४ मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते.