World Environment Day : दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:16 PM2019-06-05T13:16:00+5:302019-06-05T13:25:51+5:30

भविष्यात दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर रूप धारण करेल. असा इशाराच पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.

 World Environment Day: Environmental problem is more serious than terrorism, Naxalism! | World Environment Day : दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर!

World Environment Day : दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर!

Next

अकोला: वाढते तापमान, जमिनीतील पाण्याची घसरत चाललेली पातळी ही आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वृक्ष लागवडीकडे होत असलेले दुर्लक्ष, पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असल्यामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. भविष्यात दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर रूप धारण करेल. असा इशाराच पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.
लोकमतच्यावतीने मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त परिचर्चा आयोजित केली होती. या परिचर्चेमध्ये सहभाग घेताना, पर्यावरण तज्ज्ञांनी पर्यावरणाच्या ºहासावर चिंता व्यक्त केली आणि दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वाढता वापर, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अमाप वृक्षतोड, जलसंचयाचा अभाव, अपव्यय यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकारसुद्धा गंभीर नाही. एकीकडे ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबवायची आणि दुसरीकडे रस्त्यांच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडून टाकायचे आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण करायचे, अशी दुटप्पी भूमिका केंद्र व राज्य शासनाची असल्याचा आरोपही पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिकवर कडेकोट बंदी, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर, वृक्ष लागवड, जलसाक्षरतेची जनजागृती करून जलव्यवस्थापनाबाबत जनतेला जागरूक करून शालेय स्तरावर पर्यावरण मूल्ये रुजविण्याची गरज आहे. अन्यथा दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या निर्माण होण्याची भीतीही पर्यावरण तज्ज्ञांनी बोलताना व्यक्त केली.


सध्या राज्यभरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून, त्यासाठी अमाप वृक्षतोड केली जात आहे; परंतु वृक्षतोड थांबविण्याकडे शासनाचे लक्ष नाही. विकासाचे नियोजन नाही. प्लास्टिक बंदी केली; परंतु त्याची अंमलबजावणी नाही. प्लास्टिक, थर्मोकोलपासून अनेक गंभीर आजार होतात. याबाबत जनजागृती नाही. मनुष्य पाच पट पर्यावरणाचे नुकसान करीत आहे. पिंपळ, वडासारखे वृक्ष ९0 ते ८0 टक्के आॅक्सिजन देतात; परंतु या वृक्षांची लागवड करण्यात येत नाही. त्यामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनत आहे.
-देवेंद्र तेलकर, अध्यक्ष सृष्टीवैभव
निसर्ग संवर्धन संस्था


प्रगतीचे पाऊल पुढे टाकताना आम्ही पर्यावरणाचा विचार करीत नाही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताने जगाला प्लास्टिक मुक्तीचा विचार दिला; परंतु प्रत्यक्षात भारतातच सर्वाधिक प्लास्टिकचा वापर होतो. पर्यावरण संरक्षणाबाबत केंद्र शासन गंभीर नाही आणि त्यासाठी केंद्र शासनाकडे कोणतेही धोरण नाही. पर्यावरणाबाबत केंद्र शासनाने धोरण बदलावे. वाढती वाहन संख्या, कारखाने, रस्त्यांचे काँक्रिटीकरण थांबवून पर्यावरण संरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्लास्टिकबंदीवर जनतेमध्ये जागरूकता हवी.
-उदय वझे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

पर्यावरण संरक्षण संस्कृतीपासून आपण दूर गेलो आहोत. पर्यावरणाचे संस्कार मुलांवर होत नाहीत. शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. झाड, पक्षी, जल हे पाहणे आनंददायी आहे. प्रत्येकाने घर, परिसरात वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. शिक्षणामध्येसुद्धा पर्यावरणाचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
-अमोल सावंत, संस्थापक निसर्ग कट्टा

 

Web Title:  World Environment Day: Environmental problem is more serious than terrorism, Naxalism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.