सफाई कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

By Admin | Updated: June 26, 2014 02:07 IST2014-06-26T01:59:01+5:302014-06-26T02:07:00+5:30

आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांचे वेतन कापण्याचे अकोला महापालिका प्रशासनाचे आदेश.

Workers' agitation of cleaning workers | सफाई कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

सफाई कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

अकोला : महापालिका प्रशासनाने बदल्या केल्याच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सफाई कामगारांपुढे न झुकता महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कामावर न येणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन कापण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत.
शहरातील स्वच्छतेची समस्या मार्गी लागण्यासाठी महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या झोननिहाय नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने विरोध केला. पूर्वसूचना अथवा चर्चा न करताच मनपाने ७४0 सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सफाई कर्मचारी विजयनगर, शिवाजीनगर, बापूनगर, चवरे प्लॉट, खदान या भागात राहतात. बदल्यांमुळे त्यांना संबंधित वॉर्डात जाणे व येण्यासाठी रोज ४0 रुपये खर्च येणार आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहे. बदल्यांमुळे महिलांना लवकर घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल, असाही दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे या बदल्या रद्द करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसच्यावतीने कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी सकाळी सफाई कामगारांनी काम केलेच नाही. महापौर व उपमहापौर यांनी सफाई कामगारांना आंदोलन न करण्याची विनंती केली होती; परंतु ती धुडकावून लावत सफाई कामगार संपावर गेले. दुपारी सफाई कामगार उपायुक्त चिंचोलीकर यांच्याशी चर्चा करण्याकरिता व आपले म्हणणे मांडण्याकरिता महापालिकेत गेले; परंतु उपायुक्त न आल्याने चर्चा होऊ शकली नाही. सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम अकोला शहरातील स्वच्छतेवरदेखील दिसून आला.

Web Title: Workers' agitation of cleaning workers