अवकाळी पाऊस अन् गारपीट; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे बच्चू कडू यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 21:49 IST2021-12-28T21:48:57+5:302021-12-28T21:49:07+5:30
पावसाळा संपल्यानंतरही हिवाळ्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

अवकाळी पाऊस अन् गारपीट; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे बच्चू कडू यांचे आदेश
अकोला : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी बहुतांश ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीस आलेल्या तूर पिकाचे नुकसान झाले. तर रब्बीचा हरभरा, कांदा, गहू व भाजीपालासह इतर पिकांनाही फटका बसला आहे.
पावसाळा संपल्यानंतरही हिवाळ्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यातच मंगळवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये रब्बीच्या हरभरा, कांदा, गहू, भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर काढणीला आलेली आहे. या पिकालाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पुरते मोडले गेले. याचपार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे.
आज जिल्ह्यात अवकाळी पाऊस,वीज कोसळणे व गारपीट या नैसर्गिक आपत्तीची घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तूर,हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तसेच वीज कोसळल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यादृष्टीने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे,असे निर्देश बच्चू कडू यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदतनिधी बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,असे बच्चू कडू यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.
तासभरात बरसला ३७.३ मिमी पाऊस-
अकोला जिल्ह्यात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर हा पाऊस बरसला. अकोला शहरातसह परिसरातील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
रस्त्यावर तुंबले पाणी-
या पावसामुळे अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौक, डाबकी रोड, आरोग्य नगर, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबले होते. नाल्या भरल्याने हे पाणी रस्त्यावर साचले. नागरिकांना या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याचे चित्र होते.