Two pistols seized in Tushar Pundkar massacre; Four cartridges were also taken into custody | तुषार पुंडकर हत्याकांडातील दोन पिस्तूल जप्त; चार काडतुसेही घेतली ताब्यात

तुषार पुंडकर हत्याकांडातील दोन पिस्तूल जप्त; चार काडतुसेही घेतली ताब्यात

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना अटक केल्यानंतर या आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत. तुषार यांच्यावर दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, तसेच यामधील घटनास्थळी सापडलेल्या पिस्तूलमधून दुसरा राउंड फायर करण्यात आला होता. तर अकोटातील विहिरीतून जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलमधून तुषारवर पहिला राउंड फायर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक गावकर यांनी दिली.
अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांना या प्रकरणात तपास करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती. सत्तर अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग असलेल्या सहा पथकाने ३५ दिवसांच्या दिवस-रात्र अथक परिश्रमानंतर तसेच योग्य ते पुरावे गोळा झाल्यानंतर पोलिसांनी अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना २६ मार्च रोजी अटक केली. हा शोध लावण्यात पोलिसांना १५ दिवसांपूर्वीच यश आले होते; मात्र योग्य ते पुरावे आणि ठोस हातात लागल्यानंतरच पोलिसांनी २६ मार्च रोजी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली. या आरोपींना ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, त्यांनी दिलेल्या माहितीवरून अकोट-अंजनगाव रोडवरील एका विहिरीतून जिवंत काडतुसे आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तर घटनास्थळावरून यापूर्वीच पहिली पिस्तूल जप्त करण्यात आली होती. तुषार पुंडकर हत्याकांडात आता दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या असून, या दोन्ही पिस्तूलमधून तुषारवर गोळ्या झाडल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिली. तुषारवर घटनास्थळावर सापडलेल्या पिस्तूलमधून दुसरा राउंड तर विहिरीतून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलीतून पहिला राउंड फायर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिली. यासोबतच ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

Web Title:  Two pistols seized in Tushar Pundkar massacre; Four cartridges were also taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.