थंडीचा कडाका वाढत असतानाच अकोला महानगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात प्रचाराने वातावरण चांगलेच तापले आहे. 'काय म्हणतंय अकोल्याचं इलेक्शन?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण, आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
अकोला शहर व जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता भाजप आणि काँग्रेस यांच्यातच पारंपरिक लढत पाहायला मिळाली आहे. मात्र, यंदाचे चित्र वेगळे आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम वेगवेगळे पण एकसोबत मैदानात उतरल्याने लढत बहुरंगी आणि चुरशीची झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न सर्वच विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी (श. प.) आघाडी
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सोबत घेत ताकद वाढविली आहे. काही प्रभागांत काँग्रेसने उद्धवसेनेविरुद्ध उमेदवार दिलेले नाहीत, तर काही ठिकाणी उद्धवसेनेने काँग्रेसविरुद्ध उमेदवार टाळले आहेत.
सामाजिक समीकरणे, अल्पसंख्याक व पारंपरिक मतदारांचा आधार मजबूत करीत महापालिकेवर झेंडा फडकविण्याची रणनीती या आघाडीने आखली आहे.
भाजपची रणनीती आक्रमक
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वात प्रचाराची दिशा ठरविली आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या विकासाच्या रोडमॅपचा दाखला देत अकोला शहराचा कायापालट करण्याची आश्वासने दिली जात आहेत.
'ट्रिपल इंजिन सरकार'चा नारा देत भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १४ जागा देऊन आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कमळ पुन्हा फुलविण्यासाठी भाजप आक्रमक प्रचार करीत आहे.
शिंदेसेनेचा स्वबळाचा प्रयोग कितपत यशस्वी?
महायुतीचा घटक असतानाही अकोला महापालिकेत शिंदेसेनेने स्वतंत्र चूल मांडत स्वबळाचा नारा दिला आहे. तब्बल ६४ जागांवर उमेदवार उभे करून भाजपलाच थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्य कळीचे मुद्दे
निवडणूक प्रचारात शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, ड्रेनेज लाईन, स्वच्छता, उड्डाणपूल आणि मूलभूत नागरी सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. काँग्रेस, उद्धवसेना आणि शिंदेसेना यांनी महापालिकेतील कारभारावर बोट ठेवत आरोपांची झोड उठविली आहे.
आमदारांसह नेत्यांचा लागणार कस!
भाजपचे आमदार रणधीर सावरकर, तसेच माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे-दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी आहे.