पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:28 IST2025-06-26T19:27:38+5:302025-06-26T19:28:17+5:30

पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

Rains intensify in western Varad Akola; Rivers and drains flood | पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर

पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर

अकोला : पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सायंकाळनंतर येथून वाहतूक सुरू झाली. काही गावांचा संपर्क तुटला. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात पुरात अडकलेल्या पाच नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार असून, उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

अकोला जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले
अकोला जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यातील विश्वमित्र लघुप्रकल्प १०० टक्के भरून ओसंडू लागला आहे. मळसूर येथे नदीचे पाणी गावात शिरले आहे, तर सारकिन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. बार्शिटाकळी व पातूर तालुक्यांतील खोबरा नाल्याला पूर आल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. पातूर तालुक्यात झरांडी, मरसूळ व आलेगाव या गावांमध्येही पाणी शिरले आहे. अकोला शहरातदेखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वाशिम जिल्ह्यातही जोरदार हजेरी
वाशिम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव आणि मंगरूळपीर तालुक्यांतील काही भागांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. गुरुवारी सकाळी ०९:०० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ८८.५० मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्या, नाल्यांना पूर आला असून, लगतच्या शेतीत पाणी शिरल्याने नुकतीच उगवलेली पिके पाण्यात गेली आहेत. रिसोड तालुक्यात काच नदी व उतावळी नदीला पूर आल्याने मेहकर- मालेगाव हा मार्ग दुपारपर्यंत बंद होता.

२३ महसूल मंडळांत अतिवृष्टी; पुरात अडकलेल्यांची सुटका
बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये २५ जूनपासून ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील ९२ पैकी २३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. डोणगाव येथील पाच शेतकरी पुरात अडकले होते. शेलगाव देशमुख रस्त्यावरील कास नदीपात्रात डोणगावचे गोविंद परमाळे, आकाश परमाळे, कुलदीप परमाळे, अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कन्हाळे हे शेतकरी सकाळी शेतीकामासाठी नदीपात्राच्या पलीकडे गेले होते. अचानक आलेल्या पुरामुळे परतीचा मार्ग बंद झाला. त्यांनी निंबाच्या झाडावर आश्रय घेतला. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मेहकर- रिसोड, सुलतानपूर- मेहकर आणि मेहकर- डोणगाव हे मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: Rains intensify in western Varad Akola; Rivers and drains flood