विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 06:06 PM2020-09-15T18:06:35+5:302020-09-15T18:06:44+5:30

विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Payment of Rs 524 crore from Vidarbha power consumers | विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

Next

अकोला : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी लॉकडाऊननंतर नियमित वीज बिल भरण्यास सुरुवात केली असून, आॅगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जून महिन्यात २५ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या वीज बिलाच्या वसुलीचा आलेख आॅगस्ट महिन्यात उंचावला आहे.
मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते. मे महिन्यात ही टक्केवारी ३१ टक्क्यांपर्यंत घसरली आणि जून महिन्यात तर ती २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना दिलासा देत ग्राहकांना बिलाचे हप्तेही पाडून दिले होते. तसेच लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा एकत्रित भरणा करणाºया ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष, लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांना माहिती देण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएस, बिल तपासण्यासाठी वेब लिंक आणि छापील वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती इत्यादी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर होऊन वीज बिल भरणाºया ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

सर्वाधिक भरणा नागपूर परिमंडळात
विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात आॅगस्ट महिन्यात ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. यामध्ये सर्वाधिक वीज बिल भरणा नागपूर परिमंडळातून झाला आहे. नागपूर परिमंडळातील १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. अकोला परिमंडळातील ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपये, अमरावती परिमंडळातील १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी रुपये, चंद्रपूर परिमंडळातील ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये तर गोंदिया परिमंडळातील ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.

Web Title: Payment of Rs 524 crore from Vidarbha power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.