महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:38 IST2025-12-23T11:37:22+5:302025-12-23T11:38:55+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे.

महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम
Akola Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमधील युतीसाठी चर्चेला गती आली असतानाच, अकोला महानगरपालिकेसाठी मात्र अद्याप प्रस्तावच नसल्याने, येथे या दोन पक्षांची युती होणार की नाही, याबाबत संभ्रम निमार्ण झाला आहे.
राज्यातील नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरापालिका निवडणुकीत युतीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
राज्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेस आणि 'वंचित' मध्ये युतीच्या घडामोडी सुरू झाल्या असून, त्यादृष्टीने सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांत मुंबई येथे चर्चादेखील सुरू झाली.
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून युतीचा कोणताही प्रस्ताव 'वंचित'कडे अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होणार की नाही, याबाबत सद्यःस्थितीत संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.
५०% 'फॉर्म्युल्या'वर सहमतीनंतर होणार शिक्कामोर्तब?
मनपाच्या निवडणुकीत राज्यातील काही ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजी नगरसह मुंबईत युतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेल्या चर्चेला गती आली आहे. त्यामध्ये युतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ५० टक्के जागावाटपाचा फार्म्युला देण्यात आला.
चर्चेदरम्यान जागा वाटपाच्या या 'फार्म्युल्या'वर सहमती झाल्यानंतर मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि 'वंचित'मधील युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वंचितच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर याबद्दल माहिती देताना म्हणाले की, "भाजपला रोखण्यासाठी मुंबई आणि नागपूर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युतीसाठी 'वंचित'कडून प्रत्येकी ५० टक्के जागांचा फॉर्म्युला देण्यात आला आहे."
"चर्चेतून तोडगा निघाल्यास आनंदच आहे. अकोल्यात मात्र अद्याप कुठलीही चर्चा नाही आणि काँग्रेसकडून तसा प्रस्ताव देखील प्राप्त नाही. इतर काही महानगरपालिकांत प्रस्ताव आल्यास हाच फॉर्म्युला आमच्याकडून कायम ठेवण्यात आला आहे", अशी वंचितची भूमिका असल्याचे पुंडकर यांनी स्पष्ट केले.