Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:15 PM2019-10-04T12:15:04+5:302019-10-04T12:15:13+5:30

बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत.

Maharashtra Election 2019: Anger in appirants; rebilation in all party | Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

Next

- राजेश शेगोकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उमेदवारीपासून डावललेल्या इच्छुकांनी मतदारसंघात नाराजीची हवा निर्माण केली असून, पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले आहे. बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत.
बाळापूर मतदारसंघ हा गत दहा वर्षांपासून भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. भारिप आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रिंगणात असून, यावेळी विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी बंडाचे निशाण फडकवित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याच मतदारसंघात ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या डॉ. रहेमान खान यांनी ‘एमआयएम’चा झेंडा खांद्यावर घेतला आहे. डॉ. खान हे बाळापूरसाठीच इच्छुक होते; मात्र पंधरा दिवसांपूर्वी ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी पत्रक काढून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोला पश्चिममधून डॉ. खान यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जाहीर विनंती केली होती. अकोला पश्चिममध्ये इमरान पुंजानी यांची उमेदवारी ‘वंचित’ने जाहीर केल्यामुळे अखेर डॉ. खान यांनी बाळापूरसाठी एमआयएमची साथ घेऊन रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. गुरुवारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी डॉ. खान यांची उमेदवारी जाहीर केली.
अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी ‘वंचित’मध्येही वंचित राहावे लागत आहे’, असा आरोप करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँगे्रस आघाडीच्या जागा वाटपात बाळापूर हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला गेल्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची निराशा झाली आहे. यावर्षी प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसचा ‘पंजा’ नसेल. त्यामुळे इच्छुकांपैकी प्रबळ दावेदार असलेले प्रकाश तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे अजाबराव टाले यांनी काँग्रेसमध्ये उमेदवारी विकल्या जाते, असा आरोप करीत पक्षाचा राजीनामा दिला. त्यांना गुरुवारी विदर्भ माझा पक्षातर्फे अकोला पूर्वची उमेदवारी देण्यात आली आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात भाजपसह, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन्ही तालुक्यांत पिंपळे यांच्याविरोधात बैठक घेत त्यांचे काम न करण्याचा जाहीर निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे येथे बंडाचे निशाण फडकेल, अशी शक्यता होती. ती गुरुवारी प्रत्यक्षात आली.
भाजपाचे विधानसभा विस्तारक व तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. नाचणे हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषद सदस्य होत्या. नाचणे यांच्या रूपाने या मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले असून, आणखी काही नाराज रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अखेर काँगे्रसची उमेदवारी साजीद खान पठाण यांना
अकोला पश्चिम मतदारसंघाचा गुंता गुरुवारी रात्री सुटला व काँग्रेसची उमेदवारी महापालिकेतील गटनेते साजीद खान पठाण यांना घोषित झाली. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारीचे पारडे साजीद खान व डॉ. जिशान खान यांच्यामध्ये फिरत होते.
गुरुवारी सकाळपासूनच या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर काँग्रेसच्या चौथ्या यादीत साजीद खान यांचे नाव झळकले. अकोला पश्चिम हा मुस्लीमबहुल मतदारसंघ असून, बाळापूर मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यामुळे येथे खान यांना उमेदवारी देऊन मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Anger in appirants; rebilation in all party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.