मुलांनी केली आईची फसवणूक

By Admin | Updated: June 8, 2014 00:12 IST2014-06-07T22:32:44+5:302014-06-08T00:12:00+5:30

पोलिस तपासानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Kids cheated on their mother | मुलांनी केली आईची फसवणूक

मुलांनी केली आईची फसवणूक

अकोला : बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा, घर, फ्लॅट हडपण्याचे प्रकार अलीकडे प्रचंड वाढले आहेत. शनिवारी दुपारी अशाच प्रकारची तक्रार आईने मुलांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. पोलिस तपासानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बोरगाव मंजूमधील रेल्वे स्टेशनजवळ राहणार्‍या जगपती अयोध्याप्रसाद परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याजवळ १.९ हेक्टर ९२ आर जमीन आहे. २0 जून २00५ रोजी जगपतीबाईचे मुले बापूराव परदेशी व विनोद परदेशी यांनी तिची दिशाभूल करून तिच्या एका कोर्‍या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतल्या आणि जमीन ताब्यात घेतली. ही बाब जगपतीबाईच्या लक्षात आल्यावर तिने मुलांना विचारणा केली. तेव्हा मुलांनी या जमिनीवर आता आमचा ताबा आहे. तुझा जमिनीशी काहीएक संबंध नाही, असे म्हटले आणि तिला घरातून हाकलून लावत, शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. स्वत:च्या पोटचे मुलंच आपल्यावर अन्याय करीत आहेत. आता कुणाकडे दाद मागावी, या विवंचनेत ही महिला सापडली. अखेर तिने मुलांविरूद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी शनिवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीसाठी ठेवली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मुलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. 

Web Title: Kids cheated on their mother