अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे. ‘गिरते को उठाना स्वर्ग मेरा... इन्सानियत एकही धर्म मेरा...’ जगात माणुसकीला महत्त्व आहे. कोणीही संकटात सापडलं तर त्यांच्या मदतीला धावून जाणं प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य, माणुसकी जपण्याचा प्रयत्न अकोल्यातील मायलेकींनी केला. या मायलेकींनी केरळचा ओनम फेस्टिव्हल आणि केरळची प्रसिद्ध खीर पाल पायसम ग्राहकांना खाऊ घालून आलेला नफा केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्याचा संकल्प केला.न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये मलविंदर कौर गोसल आणि त्यांची मुलगी कवलजित गौसल या मायलेकी छोटसं रेस्टॉरंट चालवितात. या रेस्टॉरंटमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक परप्रांतीय विद्यार्थ्यांसह स्थानिक विद्यार्थी, नागरिकसुद्धा अल्पोपाहार करण्यास येतात. शनिवारी केरळचा प्रसिद्ध उत्सव ओनम होता. परंतु, केरळ राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि अनेकांचे प्राण गेले. हजारो लोक बेघर झाले. त्यांनी आपल्याकडून खारीचा वाटा द्यावा. या भावनेतून मायलेकींनी ओनम उत्सवानिमित्त स्पेशल पाल पायसम खीर बनविली होती. ही खीर खायला अनेक परप्रांतीय विद्यार्थी, केरळचे काही विद्यार्थीसुद्धा आले होते. अकोल्यातील नागरिकांनी सुद्धा त्यांची मदतीची भावना पाहून, खीर विकत घेतली. यासोबतच इतर खाद्यपदार्थही विकत घेतले. यातून तीन हजार रुपये नफा प्राप्त झाला. या नफ्यामध्ये आपली काही रक्कम टाकून केरळच्या पूरग्रस्तांना फूल नाही फुलाची पाकळीएवढी मदत देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गुरमितसिंह गोसल, मलविंदर कौर आणि कवलजित हे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही मदत देणार आहेत. पैसा किती दिला, याला महत्त्व नाही; त्यापेक्षा भावना महत्त्वाची आहे.
अकोल्यातील मायलेकींची व्यवसायातील नफ्यातून केरळ पूरग्रस्तांना मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:57 IST
अकोल्यातील मायलेकींनी केरळची प्रसिद्ध खीर पाल पायसम ग्राहकांना खाऊ घालून आलेला नफा केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्याचा संकल्प केला.
अकोल्यातील मायलेकींची व्यवसायातील नफ्यातून केरळ पूरग्रस्तांना मदत!
ठळक मुद्देमलविंदर कौर गोसल आणि त्यांची मुलगी कवलजित गौसल या मायलेकी छोटसं रेस्टॉरंट चालवितात. अकोल्यातील नागरिकांनी सुद्धा त्यांची मदतीची भावना पाहून, खीर विकत घेतली. तीन हजार रुपये नफ्यामध्ये आपली काही रक्कम टाकून केरळच्या पूरग्रस्तांना फूल नाही फुलाची पाकळीएवढी मदत देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.