राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:22 IST2025-02-13T19:10:16+5:302025-02-13T19:22:17+5:30

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झालं आहे.

Former NCP MLA Tukaram Bidkar dies in accident at akola | राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर

मनोज भोगडे

अकोला: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर शिवरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले बाळापूर तालुका मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष राजदत्त मानकर हेसुद्धा अपघातात ठार झाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिडकर हे मानकर यांच्यासोबत दुचाकीने शिवणी विमानतळावर गेले होते. भेट झाल्यानंतर परत येताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिवर येथील पेट्रोल पंपाजवळ जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) बिडकर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ३० बीआर ९११०) जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर असलेले बिडकर व मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते आमदार

प्रा. तुकाराम बिडकर हे उत्कृष्ट खेळाडू होते. कबड्डी या खेळात त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. जय बजरंग व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कुंभारीसह जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था आहेत.
तोलंगाबाद येथे जन्मलेल्या प्रा. बिडकर यांनी राजकीय कारकीर्दीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतीसुद्धा होते. त्यानंतर २००४ मध्ये ते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून ते पवारांच्या सोबत होते. आमदार असतानाच त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता ते दिग्दर्शक

माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर २०१४ मध्ये खैरलांजीच्या माथ्यावर, २०१७ मध्ये झरी, २०२२ मध्ये ‘तू फक्त हो म्हण’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली.

याशिवाय, शेतकरी आत्महत्या या संवेदनशील विषयावर आधारित ‘आसूड’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका निभावली होती. नेता ते अभिनेता अशी प्रवासगाथा त्यांनी आपल्या कारकीर्दीत साकारली.

चंद्रशेखर बावनकुळेंनी वाहिली श्रद्धांजली

"विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच मूर्तिजापूर मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम जी बिडकर यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ करणारे आहे. विधिमंडळात आम्ही सोबत काम केले. पक्षीय मतभेदाच्या भिंती ओलांडून स्नेहभाव जपणारा एक चांगला मित्र मी आज गमावला. दिवंगत तुकाराम जी बिडकर यांनी विदर्भात अनेक व्यायाम शाळा सुरू केल्या. ते उत्कृष्ट क्रीडापटू होते. मल्लखांब या क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी त्यांनी फार मोठे काम केले. राजकारण, समाजकारणात व्यस्त असूनही त्यांच्यातील कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला. एक दिलखुलास मित्र त्यांच्या निधनाने आज आपण गमावला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Former NCP MLA Tukaram Bidkar dies in accident at akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.