पीक विम्याचे मिळालेले ५ रुपये, शेतकऱ्याने केले परत ! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:32 IST2025-10-30T14:30:01+5:302025-10-30T14:32:17+5:30
Akola : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे.

Farmer returns Rs 5 received as crop insurance! Farmers mocked in Pradhan Mantri Fasal Bima Yojana
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अस्मानी संकटात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला बुधवारी परत केली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर चक्क पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा झाली.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही केवळ आर्थिक थट्टा असल्याचा आरोप करत, नाराज शेतकऱ्यांनी ही तुटपुंजी मदत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला परत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीक विम्याची रक्कम धनादेशाद्वारे परत केली आहे. यावेळी आदित्य मुरकुटे, उमेश कराड, अविनाश नागरे, रोहित वखारे, नंदकिशोर मोडक, सुधाकर दामोदर, देवीदास गावंडे, नीलेश वाकोडे, मनोज पाचबोले, रघुनाथ कोल्हे, केशव केंद्रे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली तुटपुंजी रक्कम
- कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा आणि रेल या गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई म्हणून ५ ते २७ रुपये जमा झालेत.
- अरुण राऊत या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ 3 रुपये ८ पैसे, संदीप घुगे यांना ५ रुपये, गणपत सांगळे यांना १३ रुपये, विजय केंद्रे यांना १४ रुपये ७ पैसे, केशव केंद्रे यांना १६ रुपये १५ पैसे, आदित्य मुरकुटे यांना २१ रुपये ८५ पैसे आणि उमेश कराड यांच्या खात्यावर २७ रुपये ५ पैसे जमा झालेत.
- तुटपुंजी रक्कम मिळालेले हे शेतकरी प्रातिनिधिक आहेत. याव्यतिरिक्त आणखीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.
"शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची जी रक्कम जमा झाली आहे, त्या पैशांत तर एक पाव साखरही विकत घेता येत नाही. अशा रकमेच्या स्वरूपात मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे ही रक्कम परत केली आहे."
- कपिल ढोके, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी