'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:01 IST2025-10-06T13:59:04+5:302025-10-06T14:01:36+5:30
Akola : अपघाताचा बनाव करून पैस उकळण्याचा प्रयत्न; माजी आमदारांची सतर्कता

'Deputy Chief Minister asked to seek help from you': Attempt to cheat former Akola MLAs by crooks
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला-वाशिम रोडवर अपघात झाला असून, तीन जण ठार झाले व चार जण ऑक्सिजनवर आहेत. आम्ही ठाण्याचे राहणारे असून, तातडीने मदतीची गरज आहे, अशी माहिती अज्ञाताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून दिली. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेते म्हणून अकोला येथे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना माहिती दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजोरिया ताफा घेऊन पातूर रोडवर अपघात स्थळाकडे रवाना झाले. त्यानंतर हा बनाव असून उपमुख्यमंत्र्यांकडून पैसे उकळण्यासाठी फेक कॉल करण्यात आल्याची माहिती समोर आली. बाजोरिया यांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली असून, फोन करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच गोपीकिशन बाजोरिया यांनी पातूरकडे तब्बल ४२ किलोमीटर अंतरावर शोध घेतला. त्यांच्यासोबत शिंदेसेनेचे पदाधिकारी होते. कुठेच अपघात स्थळ आढळले नाही. दरम्यान, कॉल करणारी व्यक्ती सतत ठिकाण बदलत नवीन माहिती देत राहिली. इतकेच नव्हे, तर त्याने 'फोन पे'द्वारे पैसे मागितले, त्यामुळे संशय अधिकच गडद झाला.
शेवटी हा कॉल फेक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचा मोबाइल बंद केला. अशा खोट्या कॉलमुळे गरजूंना मदत मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी म्हटले आहे.
"माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एक मोबाइल नंबर दिला आहे. त्यावरून बनावट कॉल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही चौकशी करीत आहोत."
- अचिंत चांडक, पोलिस अधीक्षक, अकोला
"अकोला जिल्ह्यातून कुणीतरी अपघात झाल्याचा कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यानुसार आम्ही घटनास्थळाकडे खाना झालो. संबंधित व्यक्ती जागा बदलत बोलत होती. हा प्रकार बनावट असल्याचा संशय आल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अखेर फोन बंद केला. ज्या नंबरवरून फोन झाला होता, तो नंबर चौकशीसाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठविला आहे."
- गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार