गेल्या दोन महिन्यांपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, यामध्ये प्रथम लस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे; परंतु लस उपलब्ध नसल्याने नागरिक परत जात होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस उपलब्ध झाल्याचे माहीत होताच, परिसरातील अनेक गावांतील नागरिक लस घेण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. काही जण आरोग्य यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दररोज ५० लस उपलब्ध होत असताना, याठिकाणी २०० च्या वर नागरिक लस घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन होत आहे. उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या ५० व्यक्तींनाच केंद्रावर लस घेण्यासाठी बोलाविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करू नये. नोंदणी केल्यावर दिलेल्या तारखेलाच लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय नाथक यांनी केले आहे.
आगर येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST