तलाठ्याच्या आत्महत्येनंतर पत्नी अन् मेहुण्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:31 IST2025-04-02T08:28:52+5:302025-04-02T08:31:39+5:30
Crime News: तेल्हारा तालुक्यातील तलाठी शीलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. गाडेगाव रोड, तेल्हारा) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे पत्नी प्रतिभा तेलगोटे (३४) आणि साळा प्रवीण गायगोळ (२६) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठ्याच्या आत्महत्येनंतर पत्नी अन् मेहुण्यावर गुन्हा
तेल्हारा (जि. अकोला) - तालुक्यातील तलाठी शीलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. गाडेगाव रोड, तेल्हारा) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे पत्नी प्रतिभा तेलगोटे (३४) आणि साळा प्रवीण गायगोळ (२६) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलगोटे यांनी ३० मार्चला सायंकाळी एमआयडीसी परिसरातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. सुसाइड नोटमधील उल्लेखानुसार, पत्नी प्रतिभा या वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा उल्लेख आहे. तसेच, साळा प्रवीण याने तलाठी सोसायटीमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्या रकमेची कपात त्यांच्या पगारातून होत होती. या सर्व घटनांमुळे मानसिक तणाव वाढल्याचा उल्लेख मृताने पत्रात केला.
लिहिले...माझा चेहरा पत्नीला दाखवू नका
सुसाइड नोटमध्ये मृताने पत्नीविषयी उल्लेख केला असून, ‘माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका, अंत्यविधी बहीण आशा बोदडे यांच्याकडे करावा,’ असे नमूद केले आहे.
तसेच, ‘पत्नीवर गुन्हा दाखल करू नये, ती स्वतः आत्मपरीक्षण करेल, पैशांपुढे नवरा आणि मुले नाहीत, फक्त पैसा हाच नातलग आहे,’ असेही लिहिले आहे.