CoronaVirus : आता अकोल्यातही ‘मास्क’, रुमालचा वापर बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:39 IST2020-04-13T10:38:58+5:302020-04-13T10:39:05+5:30
मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार.

CoronaVirus : आता अकोल्यातही ‘मास्क’, रुमालचा वापर बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर करावा, अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.
जिल्ह्यात कोरोनाचे १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क व रुमाल बांधूनच निघावे, मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १२ एप्रिल रोजी दिला. घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधित व्यक्ती कलम १८८ अन्वये पात्र ठरणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास वाहन जप्त!
जिल्ह्यात कोरोनाचे १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या रहिवास परिसरातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास तसेच वाहन चालविल्याचे आढळून आल्यास वाहन जप्त करून परवाना रद्द करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास कारवाई करण्यात येणार असून, वाहन जप्त करून परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
- प्रा. संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.