Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:43 IST2020-04-13T10:41:16+5:302020-04-13T10:43:04+5:30

कोरोनामुळे या गरीब रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळले आहे.

Coronavirus Efect: bicycles rikshaw stopped in Akola | Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले!

Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले!

ठळक मुद्देशहरामध्ये २५0 ते ३00 सायकल रिक्षा चालक आहेत. प्रवासीच नसल्यामुळे रिक्षा थांबविणे भाग पडले आहे.

- नितीन गव्हाळे 
 
अकोला: आॅटोरिक्षा, टॅक्सीमुळे शहरातील तीनचाकी सायकल रिक्षांची संख्या कमी झाली असली तरी, सद्यस्थितीत शहरामध्ये २५0 ते ३00 सायकल रिक्षा चालक आहेत. पायडल मारून सायकल रिक्षा चालविणे हे श्रमाचे काम आहे; परंतु कोरोनामुळे या गरीब रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रवासीच नसल्यामुळे रिक्षा थांबविणे भाग पडले आहे. त्यामुळे पोटाची खळगी तरी कशी भरावी, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, अशी चिंता पायडल रिक्षा चालकांना सतावत आहे.
एकेकाळी पायडल रिक्षाच शहरात धावायच्या. त्यासाठी रिक्षा चालकांना मोठे शारीरिक श्रमसुद्धा घ्यावे लागत. एवढे शारीरिक श्रम घेतल्यानंतरही २00 ते ३00 रुपये दिवसाकाठी मजुरी पडायची. हळूहळू काळ बदलत गेला. सायकल रिक्षाची जागा आॅटोरिक्षा, टॅक्सीने घेतली. पायडल रिक्षा हळूहळू मागे पडला. प्रवासीसुद्धा पायडल रिक्षाऐवजी आॅटोरिक्षा, टॅक्सीला प्राधान्य देऊ लागले. असे असले तरी शहरामध्ये सद्यस्थितीत २५0 च्यावर पायडल रिक्षा आहेत. रिक्षा चालवून पोटाची खळगी भरण्यासाठी हे चालक दिवसभर श्रम करताना दिसतात; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीमुळे त्यांच्या रिक्षांचे पायडलच थांबले आहे. रोजगार, मजुरी बुडत असल्याने जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसा उरलेला नाही. अशा परिस्थितीत या रिक्षा चालकांना निर्वासितांचे जिणे जगावे लागत आहे. काहींनी तर शाळांमधील मनपाने निर्माण केलेल्या मदत केंद्रामध्ये आश्रय घेतला आहे. प्रशासनाने आम्हा रिक्षा चालकांना मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.

गत २५ वर्षांपासून सायकल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मुलांचे शिक्षण केले. कोरोनामुळे तर आमची रोजीरोटीच हिसकावल्या गेली आहे. खायला अन्न नाही. खिशात पैसा नाही. अशा परिस्थितीत करावे काय, सुचत नाही. सध्या दानशूरांनी केलेल्या अन्नदानातून कसेबसे भागविण्याची धडपड सुरू आहे. शासनाने आम्हाला मदत करावी.
-अरुण रूपचंद बोरसे,
सायकल रिक्षा चालक


४0 वर्षांपासून सायकल रिक्षा चालवून पोट भरत आहे; परंतु असा कठीण प्रसंग आतापर्यंत कधी ओढावला नाही. गत काही वर्षांमध्ये अनेक संकटे आली आणि गेली. कोरोनामुळे तर आम्हाला देशोधडीला लावले. स्वाभिमानाने रिक्षा चालवून पोट भरणारे आम्ही, आता निर्वासितासारखे जिणे जगत आहोत.
-मंकुराम आसोले,
सायकल रिक्षा चालक.

Web Title: Coronavirus Efect: bicycles rikshaw stopped in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.