BJP's challenge in front of vanchit bahujan aghadi in akola east assembly constituency | ‘वंचित’समोर भाजपाचेच आव्हान! पुन्हा गड जिंकणार का?
‘वंचित’समोर भाजपाचेच आव्हान! पुन्हा गड जिंकणार का?

अकोला : २०१४च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी अकोला पूर्व मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाने अकोला पूर्व या मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ही जागा जिंकली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसमोर भाजपाचेच आव्हान राहणार आहे. यावेळी भारिप-बमसंचे स्वरूप बदलेले असून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रिंगणात कायम राहणार असल्याने या मतदारसंघाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्ह्यातील पूर्वीचा बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ झाला. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाने विजय मिळविला. सलग १० वर्षे या मतदारसंघाचे आमदार म्हणून हरिदास भदे यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाचे हरिदास भदे यांचा पराभव करून भाजपाचे रणधीर सावरकर विजयी झाले. सतत १० वर्षे भारिप-बमसंचा गड राहिलेल्या अकोला पूर्व मतदारसंघाची जागा भाजपाने अवघ्या २ हजार ४०० मतांनी जिंकली.

गत लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली व वंचित बहुजन आघाडीच्या नावानेच लोकसभा निवडणूक लढविण्यात आली. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या नावाने लढविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसमोर भाजपाचेच आव्हान राहणार आहे. सध्या भाजपाचे वर्चस्व असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघाची जागा पुन्हा वंचित बहुजन आघाडी जिंकणार की भाजपाच पुन्हा बाजी मारणार, याकडे आता मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

इच्छुक उमेदवार म्हणून ‘या’ नावांची आहे चर्चा!
आगामी विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर, शिवसेनेचे श्रीरंग पिंजरकर, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, विजय मालोकार, मंगेश काळे, देवश्री ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे, बालमुकुंद भिरड, माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, दामोदर जगताप, शंकरराव इंगळे, संध्या वाघोडे, शोभा शेळके, पुष्पा इंगळे आणि काँग्रेसचे विवेक पारसकर, दादा मते पाटील व अजाबराव टाले या इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे.यामध्ये पारसकर यांनी मतदारसंघात गाठीभेठी सुरू केल्या असल्याने उमेदवारी कोणाला याकडे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत अशी मिळाली होती मते!
उमेदवार                         पक्ष                 मते
रणधीर सावरकर           भाजपा          ५३,६७८
हरिदास भदे                  भारिप-बमसं   ५१२३८
गोपीकिशन बाजोरिया     शिवसेना      ३५५१४
डॉ. सुभाषचंद्र कोरपे       काँग्रेस         ९५४२
शिरीष धोत्रे                 राष्ट्रवादी काँग्रेस ६०८८
 

Web Title: BJP's challenge in front of vanchit bahujan aghadi in akola east assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.