अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांच्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटींना सोमवारी (२९ डिसेंबर) उशिरा निर्णायक वळण मिळाले. भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात जागा वाटपावर एकमत झाले असले, तरी शिंदेसेनेसोबत मात्र चर्चा फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी युती पक्की झाली आहे.
भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) तील युतीची अधिकृत घोषणा राज्यमंत्री इंद्रनील नाईक व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी रात्री उशिरा घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला तसेच तत्पूर्वी झालेल्या बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी (अजित पवार) चे महानगराध्यक्ष विजय देशमुख, भाजपचे निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने, मदन भरगड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भाजप-राष्ट्रवादी युती जाहीर झाल्याने अकोला महापालिका जाहीर झाल्याने अकोला महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीवर असा निघाला तोडगा
निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेनुसार सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आगामी मनपा निवडणुकीत भाजप ६६ जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार) १४ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.
शिंदेसेनेसोबत तडजोडीचे प्रयत्न फसले!
अकोला महानगरपालिकेतील २० प्रभागांतील एकूण ८० जागांसाठी ही युती जाहीर करण्यात आली. २०१७मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ४८, राष्ट्रवादीचे ५, तर शिवसेनेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. एकूण ६१ जागांवर या तिन्ही पक्षांचे वर्चस्व होते.
उर्वरित १९ जागांच्या वाटपावरून तीनही पक्षांत चर्चा सुरू होती; मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस शिल्लक असतानाही शिंदेसेनेसोबत तडजोडीचा तोडगा न निघाल्याने अखेर भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) ने स्वतंत्रपणे युती जाहीर केली.
"भाजप शिंदेसेनेसोबत युती करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांनी प्रत्येक प्रभागात १ याप्रमाणे २० जागांचा प्रस्ताव दिला असून, भाजपकडून १४ जागांवर सहमती दर्शविली आहे. यामध्ये दोन जागा कमी जास्त करण्यास आम्ही तयार आहोत", असे भाजपाचे निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी सांगितले.
"भाजपासोबत युती झाली असून, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष १४ जागांवर महापालिका निवडणूक लढणार आहे. महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकत्रित लढत महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत", अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी दिली.