ऑटोची दुचाकीस धडक; एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:47 IST2019-12-06T13:47:37+5:302019-12-06T13:47:56+5:30
विलास बाजीराव काळे (५०) रा. चांगेफळ असे मृताचे नाव आहे.

ऑटोची दुचाकीस धडक; एक ठार, दोन गंभीर
वाडेगाव : माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटोने दुचाकीस जबर धडक दिल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वाडेगाव ते चान्नी फाटा रस्त्यावरील पेट्रोल पंपजवळ ५ डिसेंबर रोजी घडली. विलास बाजीराव काळे (५०) रा. चांगेफळ असे मृताचे नाव आहे.
वाडेगाव येथून आॅटो क्र.एमएच ३० एएफ ५०१५ हा पातूरकडे जात होता. दरम्यान, चान्नी फाटा रस्त्यावरील पेट्रोल पंपजवळ या आॅटोवर अचानक माकडाने उडी घेतली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटोने समोरून येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३० एके ६८९७ ला जबर धडक दिली. या अपघातात विलास बाजीराव काळे (५०) रा. चांगेफळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात आॅटोचालक शरद धाडसे यांच्या डोक्याला मार लागला, तर प्रवासी असलेले प्रतीक संतोष पारसकर हेसुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुखी तहेसीन यांनी दिली. प्रतीक यांना ताबडतोब अकोला येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव चौकीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वाडेगाव चौकीचे पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)