युती शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली - मधू शिंदे

By Admin | Updated: August 31, 2015 01:43 IST2015-08-31T01:43:21+5:302015-08-31T01:43:21+5:30

फडणवीस सरकारने धनगरांची फसवणूक केल्याचा मधू शिंदे यांचा पत्रपरिषदेत आरोप; धनगर समाजाचा डिसेंबरमध्ये मोर्चा.

Alliance government cheated Dhangar community - Madhu Shinde | युती शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली - मधू शिंदे

युती शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली - मधू शिंदे

अकोला: निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी युतीची सत्ता आल्यानंतर विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात धनगरांना आरक्षण देऊ, असे आश्‍वासन दिले. त्यानुसार धनगर समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला; परंतु वर्ष उलटूनही धनगरांना आरक्षण दिले नाही. फडणवीस सरकारने धनगरांची फसवणूक केल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी मधू शिंदे, माजी आमदार हरिदास भदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला. गत ६५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी झगडत आहे. राज्यात दीड कोटी धनगर समाज असूनही या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. धनगर आणि धनगड ही एकच जमात असल्याने आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळायला हवं, अशी मागणी मधू शिंदे यांनी यावेळी केली. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळत आहे; परंतु महाराष्ट्रातील काही प्रस्थापित नेतेमंडळी धनगर आरक्षणाच्या विरोधात असून, शासनही आरक्षण द्यायला घाबरत आहेत. महाराष्ट्र शासनाने धनगर आणि धनगड असा भेद करून केंद्र शासनाची दिशाभूल चालविली असल्याचा आरोप माजी आमदार हरिदास भदे यांनी केला. राज्यातील धनगर समाज नेत्यांची नुकतीच नागपूरला बैठक झाली. बैठकीत धनगर आरक्षण कृती समिती स्थापन करण्यात आली असून, या कृती समितीच्या माध्यमातून १0 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर विधिमंडळावर धनगर जमातीचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Alliance government cheated Dhangar community - Madhu Shinde