अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:12 IST2025-12-20T12:10:31+5:302025-12-20T12:12:22+5:30
Akola Elections: अकोला महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत समीकरणे जुळवण्याच्या बैठका सुरु आहेत. महायुतीचा निर्णय सोमवारी होण्याचा अंदाज आहे.

अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
Akola Municipal Election 2026: अकोला महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी जोरात सुरू झाली आहे. शहरात युती व आघाडी होण्याची दाट शक्यता असून भाजप, शिंदेसेना व रिपाइं (आठवले) यांची युती अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. सोमवारी यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे शिंदेसेनेतील सूत्रांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना युती-आघाडीबाबत मोकळीक देण्यात आल्याने वेळेत निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सोमवारी
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व जल व १ मृदसंधारण मंत्री संजय राठोड हे अकोला महापालिका निवडणूक प्रभारी असून, सोमवारी ते अकोल्यात दाखल होणार आहेत.
सकाळी ११ वाजता ते भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जागावाटपावर चर्चा करणार असून, सायंकाळी ४ वाजता शिंदेसेनेचा मेळाव घेणार आहेत. या मेळाव्यात ते कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिंदेसेनेने २० पेक्षा जास्त जागांची मागणी केली असल्याचे शिंदेसेना सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनसेमुळे दुरावलेली काँग्रेस महाविकास आघाडीबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णयाची मोकळीक दिल्याने यातून मार्ग निघू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार!
मनसेसोबत युतीसंदर्भात प्राथमिक स्थरावर बोलणी सुरू आहे. परंतु, जागा वाटपाचा अंतिम निर्णय पक्षाचे उपनेते तथा आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख येत्या एक-दोन दिवसात बैठकीत घेतील. व योग्य तोडगा काढतील अशी माहिती उद्धवसेनेचे शहर प्रमुख आशिष गावंडे यांनी दिली.
जागावाटपावर 'वेट अँड वॉच'
भाजपकडे तब्बल १,२२४ इच्छुक उमेदवारांनी अर्जाची उचल केली आहे. वंचितकडे गुरुवारपर्यंत १०५ अर्ज प्राप्त झाले असून, १९ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
मुलाखतींना वेग
दरम्यान, भाजपने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन बार उडवून दिला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही तयारी वेगाने सुरू केली आहे. काँग्रेसने गुरुवारी मुलाखती घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम आदमी पार्टी, खोरिपा स्वबळावर लढणार असल्याच्या घोषणा झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट 'एकला चलो'च्या भूमिकेत असला तरी, आम्ही महायुतीच्या बाजूने असून, याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, २१ डिसेंबर रोजी आघाडीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.