छगन भुजबळांच्या कट्टर समर्थकाने केली आत्महत्या ! व्हाट्सअँप स्टेटस ठेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केले गंभीर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:39 IST2025-10-10T16:38:59+5:302025-10-10T16:39:26+5:30
छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक : मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात जातीय जनगणनेचा आग्रह, पत्र व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले

A staunch supporter of Chhagan Bhujbal commits suicide! He made a serious comment on the issue of OBC reservation in his WhatsApp status.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आलेगाव (ता. अचलपूर) येथील माळी महासंघ पदाधिकारी व माजी ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (९ ऑक्टोबर) आलेगाव बसस्थानकात घडली. विजय बोचरे (५९) असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले विजय बोचरे यांनी आत्महत्येपूर्वी पहाटे २:५० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पत्र लिहून ते व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. 'ओबीसींना वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना प्रवाहात येऊ द्यायचे नाही. सरपंचपदासह सर्वच पदांपासून ओबीसींना दूर ठेवले जाईल,' अशी भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
'मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसींचे आयुष्य धोक्यात आले आहे. जातीय जनगणना झालीच पाहिजे,' असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. बोचरे यांच्या आत्महत्येची बातमी समजताच व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवली. संतप्त नागरिकांनी शासनाने ओबीसी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी दाखल होऊन नातेवाइकांच्या भावना जाणून घेतल्या.
तसेच 'ओबीसी आरक्षणाचा मुद्दा शासनदरबारी गांभीर्याने मांडला जाईल,' असे सांगितले. त्यानंतरच मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी ठाणेदार रवींद्र लांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, तहसीलदार राहुल वानखडे उपस्थित होते.
नेत्यांनो, ओबीसींना वाचवा...
छगन भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, ससाणे, वाघमारे यांचा नामोल्लेख करत सर्वच ओबीसी व आरक्षणवादी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र राहून लढा कायम ठेवावा, तरच आरक्षण अबाधित राहील.
आता आरक्षण संपल्यात जमा आहे. त्यामुळे ओबीसींच्या मुलाबाळांचे काही खरे नाही, असेही बोचरे यांनी पत्रात लिहिले आहे.