कुपोषणाचे दुष्टचक्र, अकोला जिल्ह्यात शंभरावर बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 13:03 IST2019-02-08T13:03:07+5:302019-02-08T13:03:38+5:30
अकोला: कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून, यामध्ये बाळापूर तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे.

कुपोषणाचे दुष्टचक्र, अकोला जिल्ह्यात शंभरावर बालके कुपोषित
अकोला: कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून, यामध्ये बाळापूर तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण दोन्ही गटात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण दर महिन्याला केले जाते. सर्वेक्षणात जास्तीत जास्त बालके साधारण वजनाची आढळली. शंभरच्या वर बालके कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकल्याचे समोर आले आहे. मध्यम कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी केली असता ४३ बालके अतितीव्र कुपोषित आढळून आले, २६२ बालके मध्यम तीव्र कुपोषित आढळली. बाळापूर तालुक्यात कुपोषणाची स्थिती चिंताजनक असून, तालुक्यात सर्वाधिक १५ बालके ही अतितीव्र, तर ३७ बालके ही मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहेत. त्यावर प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
उंचीनुसार कुपोषित बालकांची स्थिती (ग्रामीण भाग)
तालुका मध्यम तीव्र अतितीव्र
अकोला ग्रामीण १ २६ ३
अकोला ग्रामीण २ २३ ६
बार्शीटाकळी ३१ १
अकोट ६२ ४
तेल्हारा ४९ ६
बाळापूर ३७ १५
मूर्तिजापूर १० ०
पातूर २४ ८
-----------------------------
एकूण २६२ ४३
शहरी भाग (वजनानुसार)
शहरी भागामध्ये प्रकल्प एक मध्यय अकोला शहर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ९० तीव्र कुपोषित बालके आढळून आले. तर प्रकल्प दोनमध्ये पातूर, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा आणि खदान, कृषिनगर (अकोला शहर) या भागात ३९ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे समोर आले.
यंत्रणेसमोरील समस्या
- कुपोषित बालकांना ‘एनआयसीयू’कक्षात भरती करण्यास टाळाटाळ.
- ‘एनआयसीयू’कक्षात १४ दिवसांचा उपचार केवळ १० ते १५ टक्के बालकांवरच.
- अनेक पालक खासगीत उपचार करतात; पण अनियमित.
- पर्याप्त मनुष्यबळाचा अभाव.
- एकात्मिक बाल विकास कार्यक्रमात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज.
आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास यांच्या समन्वयाने वर्षभर कुपोषित बालकांसाठी उपक्रम राबविले जातात; परंतु काही तांत्रिक अडचणी आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे प्रत्यक्ष काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
- वी.पी. सोनोने, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प, शहरी