Radhakrishna Vikhe's office open in Sangmner | थोरातांच्या संगमनेरात विखेंचे संपर्क कार्यालय, जनता दरबारही भरविणार
थोरातांच्या संगमनेरात विखेंचे संपर्क कार्यालय, जनता दरबारही भरविणार

संगमनेर (जि. अहमदनगर): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये भाजप नेते तथा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. तसेच विखे संगमनेरमध्ये जनता दरबारही घेणार आहेत. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच टोकाला जाण्याची शक्यता आहे.

विखे यांच्या जनसंपर्क कार्यालय आणि माहिती सुविधा केंद्राचे सोमवारी संगमनेर येथे उदघाटन झाले. या वेळी विखे म्हणाले, संपर्क कार्यालय सुरू होत असताना काहींनी महापुराचे कारण देत हा कार्यक्रम असंवेदनशील असल्याची टीका सोशल मीडियाद्वारे केली होती. मात्र, कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन झाले तेव्हा याच नेत्यांच्या तालुक्यात चविष्ठ जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. त्यामुळे तुम्ही करता ते संवेदनशील आहे का? असा सवाल विखे यांनी केला.

मंत्री विखे म्हणाले, येथील नेते निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगतात. त्यांनी केवळ ठेकेदारांचे पोट भरले. अनेक वर्ष बंद पडलेल्या या धरणाचे काम युती सरकारच्या काळात सुरू झाले.
ज्यांनी निळवंडेच्या पाटपाण्याची वाट लावली त्यांचे काय करायचे हे आता आपल्याला पहायचे आहे. संगमनेर तालुका राज्यात दुष्काळाचे मॉडेल असल्याचेही ते सांगतात. हा तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळले. आता हे मॉडेल आऊट डेटेड झाले आहे.


Web Title: Radhakrishna Vikhe's office open in Sangmner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.