दुष्काळ प्रश्नी राष्ट्रवादी सरसावली!

By Admin | Published: July 2, 2014 12:34 AM2014-07-02T00:34:27+5:302014-07-02T00:34:27+5:30

अहमदनगर: विधानसभेच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे़

Nationalist Congress | दुष्काळ प्रश्नी राष्ट्रवादी सरसावली!

दुष्काळ प्रश्नी राष्ट्रवादी सरसावली!

googlenewsNext

अहमदनगर: विधानसभेच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे़ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र व राज्याकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पालक मंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्रकार परिषदेत दिली़
राष्ट्रवादी भवनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला़ मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला़ पिचड म्हणाले, राज्यात पावसाने दडी मारली आहे़ पाऊस लांबल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे़ पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे़ या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे़ दुष्काळाबाबतचे प्रस्तावही त्यांनी केंद्राकडे सादर केले आहेत़ केंद्राकडून राज्याला काय मदत मिळते, हे स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारकडूनही काही उपाय योजना करण्यात येणार आहेत़ नगर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ मुळा धरणाने तळ गाठला आहे़ निळवंडे धरणातून श्रीरामपूर शहरासाठी लवकरच पाणी सोडले जाणार आहे़ प्रमुख धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, प्रभावी उपाय योजना करण्याची गरज लक्षात घेऊन उपाय योजना करण्यात येणार आहेत़ दुष्काळ व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने येत्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा येथे होणार आहे़मेळाव्यात दुष्काळाबाबत नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे पिचड म्हणाले़
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे़ निवडणुकीच्यादृष्टीने पक्ष संघटना वाढविण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीत मोदी लाट राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत पिचड यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला़ याशिवाय विधानसभा निवडणूक एकत्रित लढवायची की स्वबळावर, याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील़ राज्यातील उमेदवारी वाटपाचे अधिकारही पक्षश्रेष्ठींनाच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ यावेळी आ़ अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,महापौर संग्राम जगताप आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची उत्सुकता
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा पहिलाच मेळावा होत आहे़ या मेळाव्यात दुष्काळ आणि निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे़ नगर शहर विधानसभा मतदारसंघातील जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे़ यादृष्टीने या मेळाव्यास महत्व प्राप्त झाले आहे़

Web Title: Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.